Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 83

दापोलीची इंग्रजी शाळा एक टेकडीवर बांधलेली होती. तीन-चार गावांच्या मध्यभागी ही शाळा होती. दापोली, जालगाव, गिहावणे वगैरे गावची मुले या शाळेत येत असत. पन्नास वर्षांपूर्वी दापोलीस दोन इंग्रजी शाळा होत्या. एक मिशनची शाळा व दुसरी बोर्डिंगची शाळा. दापोलीच्या बोर्डिंगने चालवलेली शाळा एके काळी सर्व मुंबई इलाख्यात गाजली होती. नामांकित शिक्षक, उत्कृष्ट छात्रालय, कडक शिस्त इत्यादी गोष्टींबद्दल या शाळेची सर्वत्र ख्यात पसरली होती. परंतु पुढे पुढे छात्रालयाची शाळा बंद पडली, दोन्ही शाळांचे एकीकरण झाले. नारायणराव गोगटे यांची ती शाळा होती. दापोलीचे हे नारायणराव फार उद्योगी व महत्त्वाकांक्षी गृहस्थ होते. मोठमोठया कल्पना त्यांच्या डोक्यात असत. दापोलीला आरारोटचे भरपूर उत्पन्न काढावयाचा प्रयोग त्यांनी केला. तेथील आरारोट ते आफ्रिकेत पाठवीत. त्यांची शाळा बंद    झाली. पुढे पुढे छात्रालयाची भरभराट ओसरली. मिशनच्या शाळेतही फक्त १५० ते १७५ मुलेच राहिली. ज्या दापोलीस पाच-पाचशे मुले दोन्ही शाळांमधून शिकत होती, तेथेच माझ्या वेळेस पावणेदोनशे मुले सुध्दा नव्हती. छात्रालयात माझ्या वेळेस ३०-४० मुले फक्त होती. छात्रालयसुध्दा एका टेकडीवर वसलेले होते. कितीतरी मोडकळीस आलेल्या पडक्या इमारती तेथे दिसत. 'पूर्वी हे छात्रालय भरभराटीत होते तेव्हा येथे सारी मुले दूध पीत. येथे सारी मुले नमस्कार घालीत.' वगैरे इतिहास येथे सांगण्यात येत असे.

मिशन शाळेची इमारत सुंदर होती. चित्रकलामंदिर फारच भव्य होते. कवाईत शिकण्यासाठी एक मोठा हॉलच बांधलेला होता. शाळेच्या सर्व वर्गांतून भरपूर उजेड असे. शाळेच्या दरवाज्यातून आत जाताच उंच टांगलेले घडयाळ दृष्टीस पडे. दोन्ही बाजूंस वर्ग भरण्याच्या खोल्या असत. शेवटी लांबच लांब चित्रकलेचे सभागृह होते. व्याख्याने, समारंभ, वादविवाद सारे या सभागृहातच व्हावयाचे. चित्रकलागृहालाच लागून एक शिक्षकांची खोली होती व त्या खोलीच्या पलीकडे प्रिन्सिपॉल असत. प्रिन्सिपॉल मिशनरी होता.

प्रिन्सिपॉलचे नाव गॅडनी होते. शाळेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत गॅडनीसाहेबच तेथे होते. हल्ली दापोलीस मिशनचा संबंध नाही. शाळेला मिशन हायस्कूल हेच नाव आहे; परंतु व्यवस्था 'दापोली शिक्षण मंडळ' नावाची स्थानिक संस्था पाहते. गॅडनी आजारी पडल्यावर त्याने ती शाळा या मंडळास दिली. गॅडनी दापोलीस पन्नास-साठ वर्षे होता. तो मराठी चांगले बोले. मराठी सण, मराठी तिथी, पावसाची नक्षत्रे, सारे त्याला माहीत असे. पाऊस पडताना तो विचारावयाचा, 'हे म्हातारे नक्षत्र आहे का तरणे आहे ?' कोकणात पावसाळयात विवक्षित नक्षत्रांना म्हातारे व तरणे असे संबोधण्याची चाल आहे. गॅडनी 'अमक्या नक्षत्राचे वाहन काय, कोणावर बसले आहे ?' ही सुध्दा माहिती विचारावयाचा. गॅडनी कोकणातला होता.

एके दिवशी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मी व माझे वडील इंग्रजी शाळेत गेलो. शिक्षकांच्या खोलीत आम्ही बसून राहिलो. मधली सुट्टी झाल्यावर सारे शिक्षक आले. दुसरीच्या वर्गशिक्षकांनी माझी चाचणी घेतली. 'ससा वेगाने पळाला,'  'रावणाला दहा हात होते,' 'ही शाळा सुंदर दिसते' वगैरे वाक्ये त्यांनी घातली व त्यांचे इंग्रजी भाषांतर मी करुन दाखविले. शिक्षक प्रसन्न झाले. इंग्रजी दुस-या इयत्तेस बसण्यास हरकत नाही, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले. ती चिठ्ठी हेडमास्तरांस मी नेऊन दाखविली. शेवटी माझे नाव घालण्यात आले.

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148