श्याम 56
"खरेच, माझ्या वडिलांनासुध्दा परदेशी नाही आवडत. त्यांना सहा महिन्यांची स्वदेशीमुळे शिक्षा झाली आहे. शिवराम ! माझे वडील तुरुंगात आहेत. मी देशी चेंडूशीच खेळतो, असे त्यांना कळले तर त्यांना आनंद होईल. नाही का रे शिवराम ?' मी म्हटले.
माझ्या वडिलांना स्वदेशीच्या संबंधात शिक्षा झाली आहे, हे ऐकून शिवरामला आनंद झाला. अधिकच आपलेपणा त्याला माझ्याबद्दल वाटू लागला.
"श्याम ! या वाडयाजवळच लोकमान्यांचा वाडा आहे.' शिवराम म्हणाला.
"मी पाहिला आहे तो. मी नेहमी हळूच आत डोकावतो.' मी म्हटले. 'त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली आहे. देवच ते.' असे म्हणून शिवरामने हात जोडले.
शिवरामचे पाहून मीही हात जोडले.
मित्रांनो ! लोकमान्यांच्या, न्यायमूर्ती रानडयांच्या, नामदार गोखल्यांच्या, सार्वजनिक काकांच्या त्या पुण्यात या शिवराम गवंडयासारखे स्वदेशीच्या मंत्राने भारलेले कितीसे लोक असतील ? लिखतपढतवाल्या लोकांनी जितके पाप केले आहे तितके कोणीही केले नाही. यांनीच विदेशीचा प्रचार व प्रसार केला. विदेशी वस्तूच्या चालत्या बोलत्या जाहिराती म्हणजे शिकलेले व श्रीमंत लोक. गुलामगिरीचे भोक्ते बेटे ! हा शिवराम गवंडी भराभरा चालू शकत नसेल, वेसफेस करु शकत नसेल. परंतु तो सर्वांहून अधिक शिकलेला नको का समजावयाला ? थोर देशभक्ताची हाक त्याच्या हृदयाने ऐकली. थोरांचे शब्द त्याच्या डोक्यात कायमचे बिंबले. 'चेंडू चिंध्यांचा करुन आणीन.' असे तो शिवराम म्हणाला. भाराभर कचकडयाची जपानी बाहुली आपल्या पोरांच्या हातात देणा-या विचारशून्य, मिजासी, सुशिक्षित स्त्रीपुरुषांनो ! अडाणी शिवराम पंचवीस वर्षापूर्वी मला काय सांगत होता ते ऐका.
सावंतवाडीच्या लाकडी बाहुल्या घेऊन तुमची मुले का लहानाची मोठी होणार नाहीत ? त्या ओबडधोबड बाहुल्या असतील तरी त्याच घ्या. 'आम्ही सौंदर्याचे भोक्ते आहोत. देशातील बावळटपणाला आम्ही का उत्तेजन द्यावे ? आमच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे. एरव्ही ते कलेत सुधारणा करणार नाहीत. हजारो वर्षे झाली तरी तसेच ते लाकडाचे ओबडधोबड ठोकळे रंगवून बाहुल्या म्हणून विकतील.' असे हे नाविन्याचे भक्त व सौंदर्योपासक आढयतेने म्हणतील. परंतु त्यांना सौंदर्य पाहिजे असेल तर दुसरे सौंदर्य मी त्यांना दाखवितो. देशातील गरीब कारागिरांचे धंदे चालले तर त्यांच्या मुलाबाळांना पोटभर घास मिळेल. त्या मुलाबाळांचे गाल वर येतील, गुबगुबीत दिसतील. त्या मुलांच्या तोंडावरची प्रेतकळा नाहीशी होऊन तेथे सुंदर गुलाबी रंग चढेल. तसे सौंदर्य प्रकट होईल. त्या देवघराच्या जिवंत बाहुल्या आनंदाने नाचू बागडू लागतील. त्या रमणीय गोड बाहुल्या तुम्हाला दुवा देतील. या गरीब कामगारांनी उत्कृष्ट कचकडयाची कला कोठे शिकावी ? पारतंत्र्यात कोणाला काय शिकता येणार आहे ? गुलामगिरी सर्वभक्षक आहे. स्वराज्य मिळाल्यावर मग होईल कलांचा विकास. आज कलाविकासास वाव असता तर स्वातंत्र्याची आवश्यकता उरली नसती.
परंतु असे कितीही सांगितले तरी ज्याला जवळच्या मरणा-याचे दु:ख पहावयाची सवय नाही किंवा ते दु:ख न दिसण्याइतकी ज्याची इंद्रिये जड झाली आहेत त्याला कसे पटणार ? देशी सारे वाईट, देशी सारे ओबडधोबड असे म्हणून तो विदेशीयांचेच गोडवे गाईल व त्यांनाच उदार हात देईल. 'लायक असेल त्याने जगावे,' असे आणखी वर प्रौढीने सांगेल; परंतु नालायक असतील त्यांनाही हात देऊन लायक करु व सारे जगू; असे तो महापंडित म्हणणार नाही.
'श्याम ! तू गोष्टी सांगतोस. मला एक गोष्ट सांग.' शिवराम म्हणाला.