श्याम 88
आत्याकडे रोज कोणी ना कोणी पाहुणे असावयाचेच. ओळखीचे, गावोगावचे लोक कोर्टकचेरीच्या कामासाठी यावयाचे व ते एक वेळ तरी आत्याकडे जेवावयास असावयाचेच. हे सार फुकट जेवणारे असत. आत्या त्या सर्वांना पै दक्षिणा ठेवावयाची. ती म्हणे, 'दक्षिणा दिली की, पुण्य पदरात पडते, ते पुण्य का गमवा ?' तात्या व आत्या यांचा अपूर्व जोडा होता. गरिबीतही आनंदाने कसे राहावे, हे दोघांसही माहीत होते. दोघे हसतमुख व विनोदी असत. परस्परांवर त्यांचे फार प्रेम असे.
चातुर्मास्यात आत्याची व्रते वाढत. देवांना निरनिराळया फुलांचे लक्ष वाहण्याचे तिचे संकल्प ठरत. तसेच आंब्याच्या पानाच्या पत्रावळीवर, फणासाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवणाचे ती नियम ठरवी. देवाच्या नैवेद्याला, चातुर्मास्यापुरती एका वर्षी रोज श्रीखंडाची वडी, तर दुस-या वर्षी आंब्याच्या रसाची वडी, असेही नेम ती करी. चातुर्मास्यात देवाची पूजा करण्यासाठी आत्याचा लहान मुलगा जगन्नाथ व मी आमच्यामध्ये भांडण लागे. कारण नैवेद्याला श्रीखंडाची वडी मिळत असे, एक दिवस मी, एक दिवस जगन्नाथ अशा आमच्या पाळया आत्या लावून देत असे.
गोड बोलून सर्वांकडून काम करुन घेण्याची कला आत्याला चांगली साधली होती. आत्या स्वत: पुन्हा अंग मोडून काम करणारी होती. पावसाळयात नाचणी आटवण्याचे काम करावयास आत्या पदर बांधून पुढे व्हावयाची. मग आम्ही मुलेही निघत असू. मिरच्यांना पाणी घालावयास आल्या निघाली की, आम्हीही उठत असू. भात भरडावयास घरटावर आम्हीही उभे राहून हात लावीत असू. आत्याने कसून काम करण्याची सवय मला लावली.
एखादे वेळेस जेवताना जर तुपाला वास येत असला तर आत्याच्या जगन्नाथाला खपत नसे. आत्या म्हणावयाची, 'तो श्याम बघ काही कुरकुर करतो ना ? अरे श्याम, तुमच्या नशिबाने वाशेळे तूप तरी खायला मिळते आहे. उद्या तुम्ही मोठे व्हाल तो तेही दृष्टीस पडणार नाही. दुधातुपाचे शब्दच उरतील.' आत्याचे भविष्य खरे नव्हते असे कोण म्हणेल ? देशामधील दारिद्रय वाढत आहे, हे दादाभाईजींच्या पुस्तकावरुन ती सिध्द नव्हती करीत; तर तिचा पन्नास वर्षांचा अनुभव तिला ही गोष्ट पटवीत होता. एखादे वेळेस तूप नसले तर आत्या म्हणावयाची, थांब रे, नैवेद्य आधी नका दाखवू अन्नशुध्दी हवी ना.' आम्हाला आश्चर्य वाटे की, आत्या अन्नशुध्दी एकदम कोठून आणणार ! परंतु आत्या ताकाचा थेंब भातावर वाढी व म्हणे, 'झाली अन्नशुध्दी, देव भावाचा भुकेला.' आत्या असे म्हणून मंद हास्य करी व आम्हालाही हसू येई व सारे गोड होई.
तात्यांचा सर्वात वडील मुलगा शास्त्री झालेला होता. चातुर्मास्यात ते कोणत्या तरी गावी पुराण सांगावयास जात असत. त्यांचा स्वभाव जरा तामसी होता. ते घरी खूप काम करीत. ते सशक्त होते; परंतु रागीट होते. लहान भाऊ जगन्नाथ, त्याला ते फार मारावयाचे. जरा काही चुकले की, आहेच मार. ते त्याला अमरकोश, कीर्तनमुक्ताहारातील आख्याने वगैरे पाठ करावयास लावावयाचे. शास्त्रीबोवा कीर्तन करीत. जगन्नाथाला पाठीमागे साथ देण्यासाठी तयार करावा, असे त्यांच्या मनात होते. जेवताना प्रत्येक घासाला गोविंद म्हणत नव्हतास, गंध लावले नाहीस, संध्या म्हटलीस ही नाही, काही तरी खुसपट काढून ते जगन्नाथाला रागे भरत व मारीत. दादांचा शब्द ऐकला की, जगन्नाथ व मी घाबरत असू. शास्त्रीबुवांना जगन्नाथ 'दादा' म्हणत असे. दादा म्हणजे 'वळले तर सूत नाही तर भूत' असे होते. कधी कधी ते फार लाडात यावयाचे व अगदी प्रेमाचा पाऊस पाडावयाचे; तर कधी कधी वृकव्याघ्राचे रुप धारण करावयाचे. त्यांचा चेहरा उग्र दिसे. ते नाक साफ करीत, तो आवाज किती तरी दूर ऐकू जावयाचा. शौचाहून आले म्हणजे कितीदा पायावर पाणी ओतावयाचे व किती चुळा भरावयाच्या याचे त्यांचे शास्त्र असे. शौचमुखमार्जन झाले की, हातात केरसुणी घेऊन ते सर्वत्र साफसफाई करीत व मुखाने 'नारायण नारायण जय गोविंद हरे । नारायण नारायण जय गोपाळ हरे । । ' असे म्हणत असत. दादा जगन्नाथाला मारु लागले म्हणजे तात्यांना वाईट वाटे; परंतु कर्त्या व मिळवत्या मुलाला ते काय बोलणार ?