श्याम 93
दीक्षित मास्तर म्हणून चित्रकला व शास्त्र या विषयांतील अत्यंत तज्ज्ञ असे एक शिक्षक होते. त्यांचा चेहरा फार पाणीदार दिसे. ते अत्यंत कृश होते. परंतु त्यांच्या चेह-यावर बुध्दी, कला व कल्पकता यांचा स्पष्ट ठसा दिसे. त्यांना जपानात जावयाचे होते; परंतु त्यांची ती महत्त्वाकांक्षा सफल झाली नाही. त्यामुळे ते निराश झाले होते. नास्तिक झाले होते. महायुध्द सुरु झाले त्या वेळेस पाणबुडी, टॉपेंडो वगैरे प्रयोग ते आम्हास करुन दाखवीत असत.
असे हे निरनिराळे शिक्षक शाळेत होते. शाळेत वादविवादोत्तेजक संस्था होती. या संस्थेतर्फे मुलांची व्याख्याने होतच. परंतु वेळोवेळी शिक्षकही व्याख्यानमाला गुंफीत. कधी कधी वादग्रस्त विषय घेऊन शिक्षक वादविवाद करुन दाखरीत. आठल्ये व माधवराव प्रधान या दोन शिक्षकांनी एकदा नेपोलियनवर वादविवाद करुन दाखविला. एकाने नेपोलियन रक्तपिपासू, निर्दय, राक्षस असे चित्र रंगविले; तर दुस-याने नेपोलियन म्हणजे धीरोदात्त, वीर, तत्त्वनिष्ठ, माणुसकीने भरलेला, बुध्दिमत्तेने गाढा, अलौकिक विभूती असे चित्र रंगविले. वादविवादात दोघे रंगले व आम्हीही रंगलो. हेडमास्तरांनी एकदा ज्ञानेश्वरीवर व्याख्यान दिले, ते माझ्या कानात अजून घुमत आहे. आठल्ये यांनी महाभारताची थोरवी यावर एकदा व्याख्यान दिले होते. माधवराव प्रधान यांनी तुळसीरामायणावर व्याख्यान दिले. राधारमण कवींनी रामायण व महाभारत यांतील साम्य व विरोध या विषयावर फारच अभिनव व्याख्यान दिले. केशवरावांनी 'गीतारहस्य' यावर उद्बोधक व्याख्यान दिले. ती सारी व्याख्याने माझ्या स्मरणात आहेत. त्या व्याख्यानांचा अपार परिणाम माझ्यावर झाला. आपण खूप वाचले पाहिजे, यांच्यासारखे आपणास सांगता आले पाहिजे, असे उतारे व अशी वचने मुखोद्गत पाहिजेत, श्रोत्यांस तन्मय करता आले पाहिजे, इत्यादी विचार माझ्या मनात येत. त्या व्याख्यानांनी माझी सहृदयता वाढली, विचारशक्ती वाढली, काव्यशास्त्रविनोद म्हणजे काय ते कळू लागले. एकाच वस्तूकडे निरनिराळया दृष्टींनी कसे पाहता येते, ते कळले, दापोलीच्या शाळेत मी चार वर्षे वर्गात जे शिकलो त्यापेक्षा कितीतरी त्या पाच-सहा व्याख्यानांत शिकलो, असे मला वाटते.
मीही वादविवादोत्तेजक सभेत बोलण्याचे मनात योजू लागलो. मी इंग्रजी पाचव्या इयत्तेत गेलो. तेव्हा शाकुंतल हे कालिदासाचे नाटक मी वाचून काढले. त्या नाटकाची प्रस्तावना वाचली. शाकुंतलावर आपण बोलावे, असे मला वाटू लागले. मी माझी तयारी केली. मी हेडमास्तरांस भेटलो व म्हटले की, मी वादविवादोत्तेजक सभेत विषय घेणार आहे. ते मला म्हणाले, 'तुम्ही कोणता विषय घेणार आहात ?'
मी:- मी शाकुंतलावर बोलणार आहे.
हेडमास्तर:- संस्कृत शाकुंतलावर ?
मी:- हो. मी ते वाचले आहे व तयारी केली आहे.
हेडमास्तर:- शाकुंतलावर काय तुम्ही बोलणार ? वेडे आहात झाले. शाकुंतल का तुमच्यासारख्यांचा विषय आहे ? दुस-या कशावर बोला.