श्याम 39
मी ते उंच उंच पर्वत पहात होतो. क्षणात मेघांची पांघरुणे घेणारे तर क्षणात ती फेकून देणारे हिरवे हिरवे मंदील बांधून उभे असणारे ते देवाचे पहारेकरी पाहाण्यात मी दंग होतो. क्षणात त्या बाजूला खिडकीकडे जावे. तर पुन्हा इकडच्या खिडकीकडे यावे, असे माझे नाचणे चालले होते. गाडीतील एक वेदाभ्यासजड मनुष्य मला रागाने म्हणाला, 'सारखा मूर्खासारखा नाचतोस रे काय ? एके जागी बस. लोकांना त्रास होतो की नाही उगीचच्या उगीच !' आजूबाजूला ईश्वराचे अपार सौंदर्य भव्य व गंभीर असे पसरले होते; परंतु त्या गृहस्थाच्या मनाला असा काही गारठा आला होता ! त्या सौंदर्याने कोणाचेही हृदय-थंड झालेले हृदय-नाचू लागले असते; परंतु डोळे पाहतील तर ना ? आणि डोळयांना पहावयाची सवय लागली असेल तर ना ? सूर्योदय व सूर्यास्त कोणी पाहणार नाही. रात्रीचे अनंत तारे कोणी पाहणार नाही. समुद्राची धो धो गर्जना कोणी ऐकणार नाही. नद्यांचे नाच विलोकणार नाही. दाट जंगलात रमणार नाही. फुले पाहून हसणार नाही. पाखरे पाहून नाचणार नाही. वेदामध्ये भर मध्यान्ही तळपणा-या सूर्याचीही सुंदर वर्णने केलेली आहेत. स्वच्छ निळया निळया आकाशात पोहणारा तो परमहंस. त्याची काव्ये त्या ऋषींनी केली आहेत. मध्यान्हीच्या सूर्याची निष्कंलक व घवघवीत शोभा कदाचित आमच्या दुबळया डोळयांना मानवत नसली तर निदान सूर्योदय-सूर्यास्त तरी पहावे; तेथील अनंत रंगांची शोभा पहावी; परंतु आमच्या लोकांच्या डोळयांना रस चाखण्याची सवयच नाही. सृष्टीतील अनंत सौंदर्य पाहून तन्मय होण्याची सवय नाही. सारे कृत्रिमाचे व कातडीचे भोक्ते.
ती आगगाडी ज्याप्रमाणे भयाण व गडद अंधकाराने भरलेल्या बोगद्यातून जात होती, त्याप्रमाणे मानवी समाजही अंधारातूनच जात असतो. मधून मधून बोगदे फोडून प्रकाश आत येतो त्याप्रमाणे मधून मधून उत्पन्न होणारे महापुरुष काय प्रकाश देतील तो; तीच काय ती आशा. मानवप्राणी बोगदा बांधतो. तो संकुचित भिंती आपल्या भोवती बांधतो. बिळे करुन तो राहू पाहतो. ही संकुचितपणाची भिताडे पाडून मोठी दृष्टी देण्यासाठी व मोठी सृष्टी दाखविण्यासाठी संत येत असतात. या भिंती फोडून त्यातील प्रकाशाचे झोत हे संत आत बसलेल्या क्षुद्रवृत्तीच्या माणसांवर सोडतात. रामतीर्थांना चार भिंतीच्या घरात बसणे म्हणजे कबरेत शिरल्यासारखे वाटे ! मेल्यावर मुडदा पुरतात. सर्व बाजूंनी मातीच माती ! त्याचप्रमाणे माणसे घरात बसतात व त्या घरापुरती काळजी वाहतात. बाकी दुनिया मरो का तरो. मला काय त्याचे ? ही जिवंतपणी मरणाची लक्षणे. ही जीवनयात्रेतील मरणाच्या डोहाळयांची चिन्हे महापुरुष झडझडून दूर करु पहातो.
तमसो मा ज्योतिर्गमय ।
असतो मा सत् गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।
"अरे, अंधारातून बाहेर या. असत्यातून बाहेर या. मरणातून बाहेर या. हा पहा प्रकाश हे पहा अनंत सत्य ! हे पहा चिरंजीवन !' असे हाकारे संत करीत असतात. मानवी समाजाला क्षुद्र जीवनाच्या अंधारमय बोगद्यातून प्रकाशाने भरलेल्या अनंत जीवनात आणून सोडण्यासाठी संतांची, वीरांची, कवींची नितान्त आवश्यकता असते.
दिव्य सौंदर्य पिऊन या श्यामचे डोळे धाले; परंतु त्याचे पोट उपाशी होते. त्याला भूक लागली होती. मुंबईस व्हिक्टोरिया करण्यापुरते पैसे पाहिजे होते. व्हिक्टोरियावाला किती पैसे घेईल, याचा मला अंदाज नव्हता. मी जरा खिन्न व निराश होऊन बसलो होतो. एका स्टेशनावर पहाडी बायांनी काकडया आणल्या होत्या. काकडया पाहिल्याबरोबर माझे डोळे तिकडे गेले. काकडया म्हणजे कोकणचा मेवा. मला कोकणातील घराची आठवण आली. मी दोन काकडया घेतल्या व घरची आठवण करीत करीत खाल्ल्या. घरची आठवण येताच वडील डोळयांसमोर आले. ते तुरुंगात काय करीत असतील, हे मनात आले. त्यांचा मुलगा पळून गेला, हे त्यांना कळेल का ? त्यांना कळले तर काय वाटेल ? तुरुंगातील दु:खात माझी आणखी काळजी ? घरी आई काय म्हणेल ? तिला वडिलांची अपार चिंता, त्यात माझे हे असे वर्तन ! मी रडवेला झालो, काकडी पोटात गेली; परंतु तिने माझ्या डोळयांतून पाणी आणले.