श्याम 74
पुजारी :- मग ते कोण आणणार ?
मी :- तुम्हीच आणा ना. तेथे मी कसा जाऊ ? मी गेलो तर मला आयताच पकडतील, मारतील. आणाल का तुम्ही ?
पुजारी :- कोठे राहतात मामा ?
मी :- पत्र्यामारुतीजवळ.
पुजा-याचे घर आले. दरवाजा उघडाच होता. आम्ही आत गेलो. लहानसे अंगण होते. अंगणातून ओसरीवर आम्ही गेलो. मला 'येथे पडवीस बस' असे त्यांनी सांगितले, घरातून मिणमिण करणारा एक दिवा त्यांनी बाहेर आणला.
पुजारी :- तू काही खाल्ले आहेस का ? हे आजचे शुक्रवारचे चणे खा. देवाच्या प्रसादाचे आहेत. असे म्हणून त्यांनी मला पसाभर चणे दिले. दिवसभर भटकलेल्या शिंगराला थोडी चंदी मिळाली. पुजारीबाप्पांनी घरातून पाणी आणून दिले. त्यांच्या घरातील आजीबाईंनी मला येऊन पाहिले.
आजीबाई :- लहान आहे मुलगा. कशाला बाळ पळून आलास ? चांगले मामांकडे राहावयाचे. सुखाचा जीव दु:खात का घालावा ?
पुजारी :- तो म्हणतो की, मी तुमच्याकडे राहीन. माधुकरी मागेन.
आजीबाई :- नको रे बाबा जोखीम. सकाळी त्याला पोचता कर त्याच्या मामांकडे.
मी :- नका हो असे करु. मला येथेच ठेवा ना ! येथे राहून मी शिकेन. तुमचे चार धंदे करीन. अंगन झाडीन, पाणी भरीन, पूजा करीन. काही करा; परंतु मला हाकलू नका.
पुजारी :- बरे, बघू पाणी प्यालास का ?
मी :- हो.
पुजारी :- मग आता येथे पडवीतच नीज. काही अंथरायला हवे का ?
आजीबाई :- ते फाटके तरट दे त्याला आणून. नाही तर कांबळ दे.
मी :- नको.
पुजा-याने एक अत्यंत जीर्ण झालेली कांबळ मला आणून दिली. माझे अंथरुण तयार झाले. मी त्यावर पडलो. पुजारी आत गेले. आजीबाई आत गेल्या. दिवा आत गेला. आतील दाराचा अडसर वाजला. एकटा श्याम बाहेर त्या फाटक्या रकटयावर पडला होता.