श्याम 57
मी त्या शिवरामाला एक गोष्ट सांगितली. काम करता करता तो ऐकत होता. नंतर मामीने हाक मारली म्हणून मी निघून गेलो. शिवराम कामावर आला की, मी त्याला रोज आठवण देत असे. 'शिवराम ! आणलास का चेंडू ?' तो 'नाही' म्हणे. दिवसभर शिवराम काम करुन दमे-श्रमे. त्याला वेळ तर झाला पाहिजे ना ? 'श्याम ! तुला चेंडू दिल्याशिवाय मी नाही हो राहणार ! खरेच एक दिवस आणून देईन.' असे तो मला म्हणे.
आमच्या वाडयातील शिवरामचे काम संपले.
'शिवराम ! उद्या तू येथे कामाला नाही ना येणार ?' मी विचारले.
'उद्यापासून दुसरीकडे कामाला जाईन.' शिवराम म्हणाला.
'माझा चेंडू ?' मी म्हटले.
'देईन. एक दिवस देईन.' शिवरामने आश्वासन दिले.
संध्याकाळ झाली म्हणजे मी दिंडीत बसत असे. शिवरामची वाट पाहात असे. कदाचित शिवराम येईल व आपण त्याला भेटणार नाही म्हणून मी कोठेही बाहेर जात नसे. शिवरामचा ध्यास मला लागला होता. दिवे लागण्याची वेळ आली म्हणजे निराश होऊन मी घरात जात असे. माझ्या हृदयात अंधार पसरे. परंतु पुन्हा आशेचा दिवाही लागे.
"फसव्या आहे शिवराम !' असे एक मन म्हणे. 'येईल, एक दिवस तो येईल !' असे दुसरे मन म्हणे.
"श्याम ! खेळायला का नाही जात ? येथे दररोज दारात काय बसून राहतोस ?' एक दिवस दादाने मला म्हटले.
"मी शिवरामची वाट पहात आहे.' मी म्हटले.
"का रे ?' दादाने जिज्ञासेने विचारले.
"तो मला स्वदेशी चिंध्यांचा चेंडू देणार आहे.' मी म्हटले.
"शिवराम चेंडू देणार ?' दादाने आश्चर्याने म्हटले.
"हो.' मी श्रध्दापूर्वक म्हटले.
"अरे तो दारुडया शिवराम कसला चेंडू आणून देतो !' दादा म्हणे.
"शिवराम का दारु पितो ? त्याने तर माझे डोळे पुसले. शिवराम चांगला आहे, तो देईलच चेंडू आणून.' मी म्हटले.
"तो घरी झिंगून जातो. सारे पैसे दारुत उडवितो.' दादा म्हणाला.