श्याम 145
वर्गात राम व श्याम पुन्हा एकत्र उठू-बसू लागले. मधल्या सुट्टीत मुले शाळेतील सिलिंडरे चालवीत असत. क्षेत्रफळ व घनफळ शिकविताना, चित्रकला शिकविताना सिलिंडरचा उपयोग होत असे. सिलिंडरावर उभे राहून ते भराभर पळविण्यात मी कुशल होतो. मी रामला हाक मारीत असे व म्हणत असे, 'ये राम ! आपण दोघे बरोबर उभे राहून हे सिलिंडर एकदम चालवू.' रामला धरुन ते सिलिंडर मी वेगाने नेत असे. खूपच मजा. इतके दिवसांचा आमचा अबोला, इतके दिवस मनात साठवून ठेवलेले, कोंडून ठेवलेले प्रेम शतरुपांनी बाहेर पडू पहात होते; शतमुखांनी वाहू लागले होते.
एके दिवशी श्याम रामला म्हणाला, 'राम ! आपण आपली पुस्तके बदलू या. माझे इंग्रजी रीडर तुझ्याजवळ ठेव, तुझे मजजवळ असू दे.' रामने संमती दिली. एकमेकांची पुस्तके बदलणे म्हणजे एकमेकांची हृदये बदलणे होते. त्याचे ते माझे व माझे ते त्याचे. आमची जीवने जणू, आम्ही एकमेकांस अर्पण करीत होतो ! माझ्या जीवनाचे पुस्तक चांगले होते का वाईट होते ? त्यात सुंदर चित्रे होती की वेडयावाकडया रेघोटया होत्या ? कसेही असो; राम ते हृदयाजवळ घ्यावयास तयार होता. रामचे जीवन-पुस्तक मी हृदयाशी धरण्यास उत्सुक होतो. परस्परांतील अद्वैत आम्ही अनुभवीत होतो. एकमेकांचे जीव एकमेकांत ओतीत होतो. मी ते पुस्तक घरी हातात घेऊन बसत असे व रामचा श्याम आणि श्यामचा राम' असे तोंडाने म्हणत असे.
मी रामला लांब लांब पत्रे लिहावयाचा. त्या पत्रांतून माझ्या शतभावना मी ओतीत असे. मी म्हणजे भावनामय प्राणी. भावनांच्या हातातील मी बाहुले बनतो, खेळणे बनतो. वारा पतंगाला नाचवितो त्याप्रमाणे भावनांचा प्रबळ वारा श्यामला नाचवी. प्रक्षुब्ध सागराच्या सहस्त्रावधी प्रचंड लाटा लहानशा नौकेला इतस्तत: वारेमाप फेकतात, भावनांचा कल्लोळ श्यामच्या जीवाचे तसेच करी. श्याम उल्लू, उतावळा होता. भावनांचा व वासनांचा तो गोळा होता; परंतु राम तसा नव्हता. राम संयम राखी. तो मर्यादा-पुरुषोत्तम होता. मनातील सारे तो भराभरा बोलत नसे. मी रामला म्हणत असे,
"विरक्त बाई रघुराज साचा । भोक्ता नव्हे तामसराजसाचा'
हे चरण ऐकून राम मंदमधुर हासे व माझ्या पाठीत एक थापट मारी.
राम व मी एकमेकांच्या जीवनात शिरलो. परस्परांच्या प्रेमाने रंगलो; परंतु रामची दापोलीस लौकरच ताटातूट व्हावयाची होती. रामचा मोठा भाऊ मॅट्रिकची परीक्षा पास झाला व तो कॉलेजमध्ये जाणार होता. रामची आई सर्व मुलांस घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यास गेली. राम परीक्षेसाठी मागे राहिला होता. पाचवीवी परीक्षा झाली व राम पुण्यास जायला निघाला. राम पुण्याला जाणार व श्याम दापोलीस राहणार !
"जीव राही तरी येऊनी भेटू दावू प्रेमलहरी ।।
आता जातो माघारी'
मी रामला करुण करुण असे एक पत्र लिहिले. 'राम ! माझे चांगले ते आठव. वाईट विसरुन जात. मी कसाही असलो तरी तुझ्यावर अपार प्रेम करतो हे खरे. या श्यामला तुझ्या हृदयात एका बाजूला थोडीशी जागा असू दे.' मी त्या पत्रात काय लिहिले होते. कधी न रडणारा राम; परंतु त्याच्याही डोळयांत ते पत्र वाचून क्षणभर पाणी जमा झाले. रामने त्या पत्राला उत्तर लिहिले.
"श्याम ! तू माझ्या जीवनात मला नकळत इतका शिरला आहेस की, मी तुला विसरणे शक्य नाही. जन्मभर तुझी मला आठवण राहील व प्रेम देईल.'
रामने दोनच ओळी लिहिल्या होत्या. ती रामची चिठ्ठी म्हणजे माझ्या प्रेमाची वतनदारी होती. तो माझा प्रेमाचा ताम्रपट होता. ती माझ्या प्रेमाची सनद होती. कितीतरी दिवस, कितीतरी वर्षे त्या दोन ओळींची ती चिठ्ठी मी जपून ठेवली होती !
राम पुण्यास गेला आणि श्याम ! श्यामही अकस्मात दापोली सोडून जाणार होता. राम गेल्यावर श्याम गेल्याशिवाय कसा राहील ?