श्याम 92
शिक्षकांच्या गैरहजेरीत जेव्हा ते येत, त्या वेळेस आम्हाला सुंदर सुंदर इंग्रजी उतारे ते सांगत. आम्ही प्रथम लिहून घेत असू व मग ते त्यांचा अर्थ सांगत. वुइल्यम् पिटसारख्या मोठमोठया नामांकित वक्त्यांची भाषणे आम्हाला सांगत. अर्थ सांगितल्यावर ती भाषणे ते आमच्याकडून पाठ करवून घेत. ती सुंदर व्याख्याने शिकवीत असता ते आम्हाला तन्मय करुन टाकीत. त्या उता-यातील कठीण शब्दांचे अर्थ घरुन काढून येण्यासाठी ते सांगत. परंतु माझ्याजवळ कोष नव्हता. मी माझ्या वहीत अंदाजाने अर्थ काढून नेत असे. या शब्दाचा हा अर्थ तेथे असेल असे मी मनात ठरवीत असे व तो अर्थ त्या शब्दापुढे लिहीत असे. एके दिवशी वर्गात त्यांनी मला एका शब्दाचा अर्थ विचारला. मी कल्पनेने सांगितला. ते हसून म्हणाले, 'अंदाजसमुद्रातून मंथन करुन काढलेला दिसतो !' 'होय. माझ्याजवळ कोष नसल्यामुळे मी अंदाजाने अर्थ बसविले आहेत.' ते म्हणाले, 'तुमच्या स्वावलंबनाच्या प्रयत्नाचे मी कौतुक करतो. परंतु जर एखाद्या मित्राकडे गेले असेतत तर कोष मिळाला असता. बुध्दीच्या अहंकाराने किंवा स्वत:च्या आलस्याने अंधारात चाचपडत राहण्याऐवजी तुम्ही मित्राकडे जाण्याची काळजी घेतली असती तर अर्थाचा स्वच्छ प्रकाश तुम्हाला मिळाला असता.'
आमच्या शाळेत 'राधारमण' या नावाने प्रसिध्द असलेले एक संस्कृत मुख्यअध्यापक होते. फडणीस काव्य म्हणून त्यांनी नाना फडणीसावर एक सुंदर खंडकाव्य लिहिले आहे. कधी कधी जादा तासावर जर ते आले तर ते फडणीस काव्यातील उतारे आम्हाला सांगत असत. 'काव्यदोहन' नावाच्या काव्यसंग्रहात राधारमण कवींच्या पुष्कळ कविता आहेत. त्यांनी केलेल्या हिमालय-वर्णनात यमक चमत्कार त्यांनी दाखविले आहेत. सर्व चरणच्या चरण यमकमय त्यांनी रचिले आहेत. त्यांच्या काव्याचा आम्हाला अभिमान वाटे. राधारमण कवी प्रथम पुण्यास न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होते; परंतु लोकमान्यांना १९०८ साली शिक्षा झाल्यावर राधारमण कवींनी 'आर्यभूमाताविलाप' म्हणून एक काव्य लिहून प्रसिध्द केले. अर्थातच त्यांना नोकरी सोडावी लागली. पुढे काही वर्षांनी दापोलीस त्यांना नोकरी मिळाली. राधारमण कवींच्या पूर्वेइतिहासामुळे त्यांच्याकडे आम्ही आदराने पहात असू. हेडमास्तर देवभक्त होते; तर राधारमण देशभक्त होते. राधारमण उत्कृष्ट संस्कृत शिकवीत. संस्कृत त्यांनीच शिकवावे. हसत खेळत ते शिकवीत. एखादे वाक्य किंवा श्लोक संस्कृत काव्यनाटकातील आला तर लगेच त्या काव्यनाटकाची माहिती, तो विवक्षित प्रसंग, सारे ते सांगावयाचे. यामुळे संस्कृत साहित्याची गोडी त्यांनी आम्हास लाविली. ते दिसावयासही दिलदार व भव्य दिसत असत.
केशवराव प्रधान म्हणून एक फार जुने शिक्षक शाळेत होते. ते कवी नसले तरी कवि-हृदयाचे होते. इंग्रजी व मराठी ते शिकवीत. काव्य त्यांनीच शिकवावे. त्यांचा आवाज मधुर होता. ते गाणे गुणगुणत. एखाद श्लोक गुणगुणत वर्गात यावयाचे. वर्गात संगीत येत आहे असे वाटावयाचे. ते विनोदी होते. उपहासही करण्यात त्यांचा हातखंडा असे. आमच्या वर्गात एकाचे नाव राजाराम होते. त्याला हाक मारताना, 'तू रघुपती राघव राजाराम ऊठ'. असे म्हणावयाचे व सारा वर्ग हसावयाचा. दुसरा एक मुलगा या शिक्षकांच्या घराजवळच्या राममंदिरात काकड आरतीला नेहमी जावयाचा. त्याला उद्देशून बोलताना ते म्हणावयाचे, 'ए काकडया ! काही सांगशील की नाही ? येथे अकलेचा काकडा पाजळ की जरा.' आमचे मुलांचे उत्तर केशवरावांना कधी पसंत पडावयाचे नाही. भाषांतर करताना एखादा मोठा शब्द आम्ही वापरला तर म्हणावयाचे 'पोरा ! एवढा मोठा शब्द नाही तुला झेपावयाचा. अजून साधा शब्द घाल.' साधा शब्द नेहमीच वापरला तर म्हणावयाचे, 'अरे, हा शिळा झाला शब्द. आता नवीन वापर की.'
किर्लोस्कर मासिकात सुंदर विचारप्रवर्तक लेख लिहिणारे श्री.आठल्ये हे दापोलीच्या शाळेत माझ्या वेळेस काही दिवस शिक्षक होते. आठल्ये हे प्रसिध्द लेखक आहेत. महाराष्ट्रातील कोणी जर इंग्रजीत ग्रंथरचना केली असेल तर ती आठल्यांनीच. टिळक, गांधी व विवेकानंद या तिघांची तीन सुंदर चरित्रे त्यांनी इंग्रजीत लिहिली आहेत. त्यांच्या विद्वत्तेचा फायदा दापोलीच्या शाळेस थोडाफार मिळाला आहे.