श्याम 136
मी काही फारसा बुध्दिमान नव्हतो. मी फार अभ्यास कधी केला नाही. काही विषय माझे जन्मत:च जणू चांगले होते. साहित्यातला जणू मी मासा होतो. भावना वाढलेल्या असल्यामुळे काव्य मला पटकन कळे, गद्यातीलही विचार माझ्या ध्यानात येत. परंतु गणित विषय माझा फारसा चांगला नव्हता. मी त्या विषयाकडे कधी लक्षच दिले नाही. नवनीत व बीजगणित दोन्ही पुस्तके मी बरोबर विकत घेतली. परंतु नवनीत तीन महिन्यांत जीर्ण झाले; परंतु बीजगणित कोरे करकरीत ते करकरीत. ज्याचे गणित चांगले तो बुध्दिमान समजला जातो. जगातील सारे तत्त्वज्ञ गणिती होते व सारे गणिती तत्त्वज्ञ होते. माझा राम अत्यंत बुध्दिमान होता. गणित म्हणजे त्याच्या हातचा मळ. रामचे इतर विषयही चांगले होते. श्याम गणितातील उणीव इतर विषयांतील मार्कांनी भरुन काढी. परंतु किती झाले तरी राम तो राम व श्याम तो श्याम ! हया दरिद्री श्यामला बौध्दिक वा कलात्मक गोष्टीत रामची बरोबरी शतजन्मातही करता आली नसती. राम बुध्दिमान असून कलावान होता. हृदय व डोके दोन्ही गोष्टींचा त्याच्या ठायी विकास होत होता. रामची सर्वांगीण वाढ होती. राम जन्मजात कलावान होता. एखादा सूर ऐकला, एखादी तान ऐकली की, राम वेडा होई. श्याम पूर्वजन्मी मोर होता; तर हा हरिण होता की काय न कळे !
लहानपणीच राम बासरी वाजवावयास शिकला. तो उत्कृष्ट चित्रे काढावयास शिकला. चित्रकलेच्या सा-या परीक्षा त्याने दिल्या. राम उत्कृष्ट अभिनय करणारा होता. कोणतीही भूमिका असो, तो ती हुबेहूब वठवी. राम पोहण्याच्या कलेतही पारंगत होता. तासन् तास तो तळयात उताणा पोहत राही. रामला सारे काही येई. कोणतीही गोष्ट मनात येण्याचा अवकाश की, प्रयत्न करुन राम ती हस्तगत करुन घेई. रामजवळ बुध्दी व हृदय होतेच. परंतु दृढनिश्चय, प्रयत्न यांचीही दुर्लभ जोड त्याच्याजवळ होती. प्रत्येक कला, प्रत्येक गोष्ट आपणास आली पाहिजे, असे रामला वाटे. आणि पुन्हा सर्व गोष्टींत श्रेष्ठ प्रकारचे प्रावीण्य मिळवीन, अशी त्याची सदा आकांक्षा असे. एक प्रकारे राम महत्त्वाकांक्षी होता; परंतु ती महत्त्वाकांक्षा सदोष नव्हती. महत्त्वाकांक्षा पुरी करुन घेण्याची पात्रता त्याच्या अंगी होती. त्याच्या अंगात सामर्थ्य होते. स्वत:चा सर्व बाजूंनी विकास व्हावा, असे त्याला वाटे. सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण.
असा गुणमयी राम आपणास तुच्छ लेखीत असेल, अशी शंका माझ्या मनात आली. शिकवणी धरणा-या श्यामचा तेजस्वी व बुध्दिमान राम कसा मित्र होऊ शकेल ? आपण रामचे सांगाती होण्यास, जिवाचे जिवलग होण्यास योग्य नाही, असे माझे मलाच वाटे. मला असे वाटे खरे; परंतु मनाची ओढ काही विलक्षण होती. मी रामशी प्रत्यक्ष बोलेनासा झालो; परंतु घरी दारी मी त्याच्याशीच बोलत असे. त्यालाच बघत असे. मी बाह्यत: रामपासून दूर जाऊ लागलो; परंतु अंतरंगात त्याला अधिक जवळ घेऊन बसलो.
मी व राम एकमेकांशी बोलत नाही, याचे इतर मुलांना आश्चर्य वाटू लागले. नेहमी बरोबर असणारे, बरोबर हिंडणारे श्याम व राम दूर दूर का जाऊ लागले ? मुलांचा तर्क चालेना. कोणी म्हणत, 'अती तेथे माती हेच खरे.' मी रामच्या शेजारी जात नसे, त्याच्या वा-यासही उभा राहात नसे. आता कोठले चिमणीचे चित्र, कोठले साठ; कोठले प्रेमळ वार्तालाप, कोठले शाळा सुटल्यानंतर हातात हात घेऊन बरोबर जाणे ? सारे संपले, लोपले ! त्यामुळे अपार दु:ख होई. मी घरची रामची आठवण येऊन रडत असे. याची माझी का भेट झाली, असे वाटे. देवाने आमची गाठ घालून असा दावा का साधावा, असे मी मनात म्हणे.