श्याम 25
'खोटे बोलतोस आणखी ? मघा तुझ्याभोवती सारी मुले जमली होती की नाही ? मी बघत नव्हतो ! तूच चावट आहेस. कर हात पुढे कर !' असे म्हणून गुरुजींनी माझ्या उघडया पायावर, पाठीवर छडया मारण्यास सुरुवात केली.
रडत रडत व पायावरचे काठीचे वळ चोळीत मी म्हटले, 'मास्तर नका मारु. मी त्यांना भक्तिविजयातील गोष्ट सांगितली व त्यांच्याजवळून मी रामराम म्हणवून घेत होतो. नका मारु!'
'मोठा आला राम राम म्हणवून घेणारा. मोठा प्रल्हाद की नाही तू. शाळेत नाही गोष्टी सांगावयाच्या. शाळेत शाळेतला अभ्यास. परवा त्रेसष्ट पावणे विचारले तर सांगता येईना. म्हणे रामराम म्हणवून घेत होतो. लाज नाही वाटत चुरुचुरु बोलायला. जा, जाग्यावर जाऊन बस. पुन्हा जागा सोडलीस तर फोडून काढीन. थांबा, तुम्हाला अभ्यास देतो. या २९ व्या धडयातील दहा ओळी नीट शुध्दलेखन लिहा. घ्या पाटया.' असे आम्हाला वेठीला लावून ते शिक्षक निघून गेले. त्या लिहिलेल्या शुध्दलेखनाने आमचे जीवन कितीसे शुध्द झाले असेल ? कितीसे सुंदर, समृध्द व सुखमय झाले असेल बरे !