श्याम 73
पुजारी :- बरे. आता तर माझ्याबरोबर माझ्या घरी चल. येथे तर निजता येणार नाही. माझ्याकडे झोप. मग सकाळी पाहू काय करावयाचे ते.
मी :- परंतु मला तुमच्याकडे ठेवा. मी स्वावलंबी होऊन शिकेन.
पुजारी :- बरे, बघू; चल.
आम्ही दोघे तुळशीबागेच्या मंदिराच्या बाहेर पडलो. बाहेरच्या रस्त्यावर आलो. मी रामाचा धावा करीत होतो.
कान्हा लाज राख मेरी । । धृ. । ।
हम गरीब तुम करुणासागर
दुष्ट करत बलजोरी । । कान्हा. । ।
मीराके प्रभु गिरिधर नागर
तुम पिता मै छोरी । । कान्हा. । ।
पुजा-याच्या घरी जाता जाता आमचा संवाद चालला होता.
पुजारी :- तू कोणत्या शाळेत जातोस ?
मी :- माझे नाव अद्याप कोणत्याच शाळेत नाही. मामा घरी शिकवितात मला.
पुजारी :- तुझे किती शिक्षण झाले आहे ?
मी :- कोकणात माझी मराठी पाचवी इयत्ता झाली. येथे जवळजवळ इंग्रजी दुसरीचा अभ्यास संपत आला आहे.
पुजारी :- शाळेत नाव घालण्यासाठी दाखला लागेल.
मी :- कोकणातून माझ्या वडिलांकडून मागवून घेईन मी.
पुजारी :- फीला पैसे लागतील.
मी :- नादार नाही का घेणार ? मी गरीब आहे. असे सांगितले तर नाही का मोफत घेणार ?
पुजारी :- नाव दाखल करताना तर फी हवीच. शिवाय तुला एकदम नादारी कशी देतील ? पुढे परीक्षा सर्व मुलांबरोबर होईल. त्या परीक्षेत चांगले मार्ग मिळव. मग कदाचित माफी मिळेल. तोपर्यंत कसे जमेल ?
मी :- फीपुरते पैसे माझे वडील पाठवतील. नाही तर मी कोणाकडे पाणी वगैरे भरीन. तुम्ही मला काम मिळवून द्याल ?
पुजारी :- तू काय पाणी भरणार ?
मी :- का बरे ? सदाशिव पेठेच्या हौदावर मी रोज अंघोळीस जातो तर येताना बादली भरुन आणतो.
पुजारी :- तुझे सामान कोठे आहे ?
मी :- मामांकडे माझी पुस्तके, अंथरुण-पांघरुण, कपडे सारे त्यांच्याकडेच आहे.