श्याम 32
गोकुळीच्या सुखा । अंत पार नाही देखा ।
गोपाळकृष्ण हा या भारतवर्षातील पहिला साम्यवादी महात्मा होय. श्रीमंताच्या घरचे लोणी लुटून तो सर्व गरीब मुलांना वाटून देई. गोकुळातील मुले अशक्त असताना मथुरेत लोणी विकावयास जातात, हे कृष्णाला सहन होत नसे. ते हिरावून नेऊन गोपाळांस देई. असा हा गोकुळचा राणा होता. गोपाळकृष्णाचे नाव उच्चारणे सोपे आहे; परंतु गोपाळकृष्ण जीवनात आणणे कठीण आहे. गोपाळकृष्णाचे खरे भक्त या हिंदुस्थानात असते तर एकीकडे उपासमार, दारिद्रय, दैन्य व दुसरीकडे सुखविलास, चैन व चंगळ असा देखावा दिसला नसता.
इंग्लंड देशात पंधराव्या शतकात थॉमस मूर म्हणून एक विचारप्रवर्तक लेखक झाला. त्याने 'उटोपिया' म्हणून एक ग्रंथ लिहिला आहे. उटोपिया नावाचे एक काल्पनिक बेट कल्पून तेथील लोकांची थोर संस्कृती त्या ग्रंथात त्याने वर्णिली आहे.
एकदा त्या उटोपिया बेटाजवळ दूर देशातील लोक आपल्या नावांतून बसून आले. त्या लोकांच्या गळयांत सोन्याचे गोफ होते. त्यांच्या कानांत मोत्ये होती. बोटांत हि-याच्या अंगठया होत्या. हे कोणत्या जातीचे प्राणी आहेत, ते पहावयास उटोपियातील सारे लोक जमले.
"हे तुमच्या गळयात काय आहे ? ही लोढणी कोणी घातली ? तुमचे कान कोणी टोचले ? तुम्ही का गुलाम आहात ?' वगैरे विचारुन ते उटोपियन लोक त्या श्रीमंत पशूंचा उपहास करु लागले. त्या श्रीमंतांस उटोपियन लोकांनी हृदयाची श्रीमंती शिकविली.
आपल्यामध्ये मूल बारा दिवसांचे झाले की लगेच सोनाराकडून त्याचे कान टोचतात. ते देवाघरचे आलेले ताजे फूल. ते मूल किंचाळते. लहान मुलींना धरुन त्यांची नाके टोचतात. बैलाला वेसण घालतात त्यातलाच हा प्रकार. त्या नाकात चमकी बसवून देतात. घरातील पेटीतील दागिने कदाचित कोणी चोरील तर अंगामध्येच भोके पाडून, कोनाडे-फळताळे तयार करतात. सारा आचरटपणा आहे. दुसरे काय ?
त्या 'खरे' परीक्षकांनी लहानपणी या दागिन्यांचा फोलपणा मला शिकविला. त्यानंतर पुन्हा या माझ्या शरीराला दागिन्याने कधी स्पर्श केला नाही. मी माझ्या बहिणीला सांगत असतो, 'नको ग मुलीचे नाक कान टोचू. काही दागिना घालावयाचाच असेल तर तो गळयात व हातात घाल; परंतु हा टोचाटोचीचा क्रूरपणा व रानवटपणा तरी नको !' तिच्या बुध्दीला ते पटते; परंतु असे करण्याचे अद्याप तिला धैर्य होत नाही.
दुस-या दिवशी मी पुन्हा शाळेत गेलो. आमची परीक्षा राहिली होती. माझ्या हातात कडीतोडे नव्हते, कानात भिकबाळी नव्हती. 'खरे' परीक्षकांनी ते पाहिले. त्यांनी प्रेमळपणे माझी पाठ थोपटली. त्या वेळेस मला किती तरी आनंद झाला.
परीक्षा संपली. खरे परीक्षकांनी माझ्या वडिलांची मुद्दाम गाठ घेतली. ते वडिलांना म्हणाले, 'तुमच्या मुलाला पुढे शिकविणार आहात का ? येथे तर पाच इयत्तांपर्यंतच शाळा आहे.'
वडील म्हणाले, 'एक मुलगा पुण्याला इंग्रजी शिकत आहे. आणखी श्यामला शिकविणे कदाचित शक्य होणार नाही.'