श्याम 109
गंगू रागावली व म्हणाली, 'मी बोलतच नाही जा !'
मी म्हटले, 'त्या दिवशी तुला हाका मारल्या. तुला कान तर दिसत होते. तुझे कान दुखरेही नाहीत; बहिरेही नाहीत; तरी तुला ऐकू येत नव्हते. यात मी खोटे काय सांगितले ?'
गंगू म्हणाली, 'अरे पण हा उखाणा आहे. यांत गंगू व रंगू नसते काही. ओळख; नाही तर 'शरण आलो' म्हण'
मी म्हटले, 'शरण म्हण.'
गंगू म्हणाली, 'कढई. आता तिसरा व शेवटचा हां ! बघू जिंकतोस का ! पाय असून चालता येत नाही, हात असून काही करता येत नाही - तर ते काय ?'
मी म्हटले, 'आळशी मनुष्य.'
गंगू म्हणाली, 'शेवटचा उखाणा तू जिंकलास. देव सारे शेवटी चांगले करील.'
एके दिवशी गंगू म्हणाली, 'श्याम ! अभ्यास तरी केव्हा करतोस ? नापास झालास तर तुझे भाऊ रागावतील हो. अभ्यास करीत जा. तुला दिव्याजवळ अभ्यास करु देत नसतील तर आमच्याकडे येऊन कर. तू अभ्यास करीत जा व मी काहीतरी विणीत बसेन.'
मी म्हटले, 'तुला विणायला येते ? तुला भरायला येते ?'
गंगू म्हणाली, 'मी शिकल्ये आहे. आणि त्या मुन्सफांच्या मुलीजवळ मी नवीन नवीन शिकल्ये. निरनिराळी पाखरे रुमालावर भरावयास मी शिकल्ये आहे.'
मी म्हटले, 'मुन्सफांकडे जाऊन तुम्ही काय काम करता ? फक्त पपनसच खाता ?'
गंगू म्हणाली, 'नाही काही. आम्ही झोपाळयावर बसतो. ओव्या म्हणतो. दोरीने उडया मारतो. तुला दोरीत घेऊन मी उद्या मारीन हो उडया !'
मी म्हटले, 'मी नाही येणार ! तू पाडशील मला. तुझ्याबरोबर मला उडी मारली पाहिजे. दोघांचे पाय एकदम नाही उचलले गेले तर दोरी अडकायची.'
गंगू म्हणाली, 'तू भित्राच आहेस. मुले का खेळताना भितात ?'
मी म्हटले, झोपाळयावर कसल्या ओव्या म्हणता ?'
गंगू म्हणाली, 'पाहिली माझी ओवी. अशा प्रकारे आम्ही म्हणत जातो.'
मी म्हटले, 'परंतु विसावी माझी ओवीपर्यंत फार तर असे चालेल.'
गंगू म्हणाली,
"एकविसावी माझी ओवी । एकवीस दूर्वा आणा ।
वहा देवा गजानना । भक्तिभावे ।।