श्याम 96
माझ्या मित्राने मला शाबासकी दिली. माझी शक्ती मला कळली. एक नूतन दालन जणू उघडले. मला नवीन पंख फुटले. पंख फुटलेले पाखरु हळूहळू नाचू बागडू लागले, त्या प्रमाणे मला फुटलेल्या काव्यशक्तीच्या लहान लहान पंखांनी मी उडू लागलो. पुराणातील अनेक गोष्टींवर मी कविता करु लागलो. कालियामर्दन, श्रियाळाख्यान वगैरे कथांवर मी आर्या केल्या. माझ्या या सर्व प्रयत्नात मोरोपंतांचे अनुकरण असे. कृष्णशिष्टाईच्या मोरोपंती आर्यांत-
"बहु सत्य बहु प्रिय बहु हित बहु दुराध्य बहु रुचिर । ।
शचिरम्यक्षीरधिजाननचंद्रचकोर बोलला सुचिर । ।'
अशा कृष्णाच्या भाषणासंबंधी आर्या आहेत. माझ्या कालियामर्दनाच्या आर्यांत मीही एक 'बहु बहु' असे शब्द घालून आर्या केली होती.
ईश्वराच्या स्तुतीपर मी शेकडो श्लोक रचिले. बृहत्स्तोत्ररत्नाकरातील श्लोक घेऊन त्यांचे मी मराठी तर्जुमे करीत असे. माझ्या वह्या भरु लागल्या व मी फार मोठा कवी झालो असे मला वाटू लागले. मी माझ्या वडिलांना कवितांची बाडे दाखवीत असे व त्यांना म्हणे 'या कविता छापल्या म्हणजे कितीतरी पैसे मिळतील !' माझ्या भोळया वडिलांनाही ते खरे वाटे.
मोरोपंतांची केकावली आहे. तसाही एक प्रकार मी करुन पाहिला व ४०-५० श्लोक पृथ्वीवृत्तात रचिले. जयदेव कवींची गोष्ट मी आर्या वृत्तात आणिली. 'षड्रिपुचक्र' अशी एक कविता करुन कामक्रोधादी सहा रिपूंचे त्यात मी वर्णन केले होते. मोरोपंतांप्रमाणे व आमचे शिक्षक राधारमण कवी यांच्याप्रमाणे सर्वत्र चरणच्या चरण यमकमय करण्याचा मी प्रयत्न करुन पाहिला.
चुरितसे हरिपाद सदा रमा ।।
चुरि तसे हरि-पाद सदा रम ।।
असे श्लोक मी केले होते. लक्ष्मी ज्याप्रमाणे विष्णूचे पाय सदैव चेपते त्याप्रमाणे. हा विष्णू अर्जुनाच्या घोडयाचे पाय सदैव चेपतो, अशा त्या प्रभूच्या ठिकाणी रमा, असा वरील श्लोकाचा ओढून ताणून अर्थ मी माझ्या मित्रांना सांगत असे.
ही सारी कृत्रिम काव्ये करण्यात त्या वेळेस माझी बुध्दी खर्च करीत असे. काव्य करावायचे नसते. रचावयाचे नसते. ते सहज हृदयातून बाहेर येते. झ-यातून ज्या प्रमाणे बुडबुड पाणी येते, वसंत येताच झाडाला पल्लव फुटतात, रात्र होताच आकाशात तारे चमकू लागतात, आईला पाहताच मूल एकदम हसते. त्याप्रमाणे काव्यही हृदयातून बाहेर येते. पृथ्वीच्या पोटात प्रचंड खळबळ झाली म्हणजे ती जशी भूकंपाच्या धक्क्याने बाहेर येते किंवा पर्वतांची शिखरे फोडून रसरशीत निखा-याच्या जळजळीत रसाच्या रुपाने बाहेर पडते त्याप्रमाणे कवीच्या काव्यात प्रगट होते. पोटातील उष्णता वाढली की ती बाहेर ओकल्याशिवाय पृथ्वीला राहवत नाही. पोटातील प्रसववेदना इतक्या तीव्र होतात की, बाळ जन्माला आल्याशिवाय मातेला चैन पडत नाही. त्याप्रमाणे कलावानाला हृदयातील प्रबळ भावना बाहेर शब्दांत, रंगांत किंवा दगडांत ओतल्याशिवाय राहवत नाही. तोपर्यंत त्याला चैन पडणार नाही. अशनशयन सुचणार नाही.
फ्रेंच कवी व्हिक्टर ह्यूगो एकदा सलूनमध्ये गेला. तेथे हजामाला सवड नव्हती. तेथील एका खुर्चीवर ह्यूगो बसला. त्याच्या मनात काही तरी आले. ती चुळबूळ करु लागला. हजामाने विचारले, 'काय पाहिजे ?' ह्यूगो म्हणाला, 'कागदाचा तुकडा.' हजाम म्हणाला, 'येथे कागद नाही.' ह्यूगो इकडे तिकडे पाहात होता. त्यास टेबलावर एक कागद दिसला. त्याने तो पटकन उचलला. त्याच्यावर त्याने काही तरी लिहिले. लिहिलेले स्वत:शी त्याने वाचले. ते चिटोरे हातात घेऊन ह्यूगो बाहेर पडला. हजामत करण्याचे तो विसरला.