श्याम 27
नाटक ही फारच थोर वस्तू आहे. नवदृष्टी निर्माण करण्याचे ते काम आहे. नाटकात काम करणे म्हणजे स्वत:ला विसरणे. जो स्वत:ला विसरतो तो मुक्त होय ! स्वत:ला जो न विसरेल तो उत्कृष्ट कलावान होऊ शकणार नाही. त्या त्या पात्रशी एकरुप होता आले पाहिजे. अजिंठा व वेरुळ येथील लेणी प्रसिध्द आहेत. वेरुळ येथील कैलास लेणे तर फार प्रसिध्द आहे. ते लेणे आठव्या-नवव्या शतकात तयार झाले. ज्या मुख्य शिल्पकाराने ते सिध्दीस नेले त्याने ते लेणे पूर्ण झाल्यावर त्याच्याकडे पाहिले. 'काय ! हे लेणे मी खोदले ?' असे आश्चर्योद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडले. तेव्हा आकाशवाणी झाली की 'नाही. हे देवाच्या हाताने तयार झाले.' या दंतकथेतील अर्थ एवढाच आहे की, ते लेणे तयार करताना शिल्पकार स्वत:ला विसरला होता. त्याचे हात देवाचे हात झाले होते. ते लेणे अपौरुषेय होते. त्या दगडातील तो वेद अपौरुषेय हाताने लिहिला गेला होता.
उत्कृष्ट अभिनय करणारा याप्रमाणेच स्वत:ला विसरतो. नाटकात या गोष्टीला महत्त्व आहे. स्वत:ला विसरणारा नट प्रेक्षकांसही स्वत:चा विसर पाडतो. सारे जण एका वातावरणात विलीन होऊन जातात. कला म्हणजे परमोच्च ऐक्य होय. कला सर्वांच्या हृदयांना एकाच समुद्रात डुंबायला लावते. सारे एकदम हसतात, एकदम स्फुंदू लागतात, एकदम थरथरतात ! सर्वांना स्वत्वाचा विसर पाडून ऐक्यात बुडविणारी कला धन्य नाही, असे कोण म्हणेल ?
माझ्या आजोळच्या आजोबांना नाटके पाहण्याचा फार नाद होता. ते मला लहानपणी त्यांनी पाहिलेल्या नाटकांतील गोष्टी सांगत व मी त्या उत्सुकतेने ऐकत असे. शाहूनगरवासी नाटक मंडळी दापोलीस आली होती तेव्हा त्यांनी मला दोन नाटके दाखविली होती. मी तेव्हा लहान होतो. परंतु पन्नारत्नातील गणपतराव अजून माझ्या डोळयांसमोर आहेत.
आमच्या लहानपणी आमच्या गावात आलेली ती नाटक मंडळी संगीत होती. शंकराच्या देवळात त्यांनी रंगभूमी तयार केली होती. शारदा, रामराज्यवियोग, सौभद्र व संभाजी अशी चार नाटके त्यांनी आमच्या गावात केली. या चारपैकी तीन नाटके मी पाहिली.
एके दिवशी रात्री संभाजी नाटकाचा प्रयोग चाललेला होता. शिवाजी महाराज आजारी आहेत वगैरे, असा तो प्रसंग होता, परंतु एकदम पडद्याआड मोठमोठयाने बोलाचाली होऊ लागली. शिवाजी अंथरुणावरुन उठून धावत आत गेला ! नाटक कंपनीत भांडण सुरु झाले. 'मी गात असताना मघा तू पेटी मुद्दाम नीट वाजविली नाहीस.' वगैरे शब्द कानावर येऊ लागले. खरोखरचे नाटक होऊ लागले. स्टेजवर संभाजी नाटक, तर पडताआड दुसरेच नाटक सुरु झाले. एकाच तिकिटात दोन नाटके पाहावयास मिळत होती !
प्रेक्षक शिट्टया फुंकू लागले. टाळया वाजवू लागले. खेडयातील प्रेक्षक ते ! रंगभूमीवर जाऊन 'आमचे पैसे परत द्या. तुमची मारामारी पहाण्यासाठी का तिकीट घेतले ?' असे बोलू लागले. कोणी शिव्याच देऊ लागले. सारा गोंधळच गोंधळ ! शेवटी व्यवस्थापक रंगभूमीवर आला व हात जोडून म्हणाला, 'बंधुभगिनींनो ! क्षमा करा, लौकरच रीतसर पुन्हा नाटकास सुरुवात होणार आहे. अधीर होऊ नका. झालेली गोष्ट विसरुन जा.'