श्याम 42
'श्याम ! तू लहान आहेस. तुला सारे कसे समजावू ? हे बघ आपण नेहमी राहतो ना ते लहान घर व हे जग म्हणजे मोठे घर. आईबापांचे, सख्ख्या भावाबहिणीचे छोटे घर मला नाही; परंतु या जगाचे मोठे घर मला आहे. या जगाच्या घरातील लाखो माणसे म्हणजे आपलीच भावंडे नाहीत का ? तू माझा एक लहानसा भाऊच आहेस, नाही ? या मोठया घरातील भाऊ.' तो तरुण मला अद्वैत शिकवीत होता.
'परंतु आपण तात्पुरते भाऊ. मी पुन्हा कधी भेटेन तुम्हांला ? खरा भाऊ नेहमी जवळ असतो. तुम्ही पुन्हा भेटाल ?' मी विचारले.
'श्याम ! कदाचित मी तुला परत भेटणार नाही. तू मला परत दिसणार नाहीस. परंतु दुसरे भेटतील. त्या वेळेस मला तुझी आठवण येईल. ज्याला भावाची खराखुरी तहान आहे त्याला जगात भावांचा तोटा नाही, असे म्हणून त्या तरुणाने पुढील दोन चरण म्हटले.
"प्रेमाचे भरले वारे । भाऊ हे झाले सारे ।।
ते चरण म्हणता म्हणता त्याने आपले डोळे मिटले होते. त्याने डोळे उघडले तेव्हा ते अश्रूंनी चमकले. त्याचा कंठ सद्गदित झाला. आमच्या भोवती पवित्र वातावरण निर्माण झाले. ते दोन चरण म्हणजे ती सायंकाळी म्हटलेली संध्या होती. संध्येतील उपस्थानाचे ते प्रेममंत्र होते. ते दोन चरण म्हणजे नवीन गायत्रीमंत्र होता.
ठाणे स्टेशन येऊच नये. गाडी थांबूच नये, असे मला वाटत होते. मला बोलावे, डोलावे, बसावे, बघावे, हसावे, रडावे असे वाटत होते. त्या तरुणाच्या बरोबर कायमचे राहावे, असे वाटत होते. दोन पक्षी खेळत राहतील. फिरत राहतील. आम्हा दोघांची ताटातूट होऊ नये असे वाटत होते, परंतु भावनाशून्य आगगाडी थांबली. ते दुष्ट ठाणे स्टेशन आले. तो तरुण माझ्या पाठीवर हात फिरवून उतरला. गाडी सुटेपर्यंत तो माझ्या खिडकीपाशी होता.
मी एकदम विचारले, 'तुमचे नाव काय ?'
तरुण म्हणाला, 'माधव.'
मी म्हटले, 'मी तुमचे नाव विसरणार नाही.'
तरुण म्हणाला, 'लहान श्यामला तरी हा माधव कसा विसरेल ?'
मी म्हटले, 'मघाचे चरण पुन्हा म्हणा. ती तुमची आठवण मला राहील. मी ते पाठ करुन ठेवतो.'
तरुण म्हणाला, 'ते चरण तुला आवडले होय ना ? मी जगात हे दोनच चरण लिहिले आहेत. पुढे जमेना. एवढेच माझे काय ते काव्य ! ऐक श्याम.
प्रेमाचे भरले वारे । भाऊ हे झाले सारे ।।