श्याम 91
२०. शाळेतील वातावरण
दापोलीच्या इंग्रजी शाळेचा माझ्यावर तरी फार परिणाम झाला. माझे बाहहृदय तेथे फुलले. माझ्या बुध्दीचा तेथे विकास होऊ लागला. भावना, कल्पना, विचार यांची चांगलीच वाढ या शाळेत झाली. या शाळेतील काही शिक्षकांचा कायमचा ठसा माझ्यावर उमटला आहे. शिक्षकाचे राष्ट्रीय जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षकावर राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. मुलांच्या मनावर जे संस्कार तो उमटवील ते पुढे राष्ट्राच्या मालकीचे होतील. जे इतिहास पुढे लिहिले जातात, ते इतिहास शिक्षक तयार करीत असतो. शिक्षकाचे नावगावही इतिहासात येत नाही. रणांगणावर पडलेल्या लाखो शिपायांचे नावगाव जगाला माहीत नसते; सेनापतीची नावे व सेनापतीचे पुतळे जगात दिसतात. कवी, चित्रकार, शिल्पकार, यंत्रज्ञ, वीर, मुत्सद्दी यांची चरित्रे जग वाचते. परंतु लहानपणी ज्या शिक्षकाने त्यांच्या मनोभूमी तयार केल्या त्या शिक्षकाचे नाव कोणाला माहीत असते ?
आपल्याकडे मास्तर हा शब्द तुच्छतेने उच्चारला जातो; परंतु गुरु ही फार थोर वस्तू आहे. मुलांतील सुप्त चैतन्य तो जागृत करतो. तो मुलांच्या अंत:करणात शिरुन त्यांना त्यांचा दिव्य वारसा दाखवून देतो. उज्ज्वल ध्येये त्यांच्या समोर तो ठेवतो. मुले चांगली व्हावीत म्हणून स्वत: नीट वागू लागतो. मुलांना भरपूर ज्ञान देता यावे म्हणून स्वत: विद्यार्थी होतो. मुलांना खेळाची गोडी लागावी म्हणून त्यांच्याबरोबर रानावनात वनभोजनास जातो. मुलांसाठी खरा शिक्षक काय करीत नाही ? डोळयांनी काय बघावे, कसे बघावे, कानांनी काय ऐकावे, कसे ऐकावे, तोंडाने काय बोलावे, कसे बोलावे; हातांनी काय करावे, कसे करावे; हे सारे शिक्षक शिकवीत असतो. बुध्दीचा दीप पाजळतो, हृदयात भावनांचा मकरंद निर्माण करतो, शरीराचे पावित्र्य व सामर्थ्य टिकवितो. या जगात सर्वांत अधिक कृतज्ञता कोणाविषयी दाखवावयास हवी असेल तर ती थोर शिक्षकाविषयी होय.
दापोलीच्या शाळेचे हेडमास्तर म्हणजे एक रत्न होते. ते एम्.ए.झालेले होते. ते अविवाहित होते. ईश्वराचा साक्षात्कार करुन घ्यावयाचा, हे त्यांचे ध्येय होते. सावत्र भावाचे शिक्षण पुरे होईपर्यंत ते नोकरी करणार होते व मग सर्वसंग परित्याग करुन ते जाणार होते. ते आज त्या प्रयत्नातच आहेत. ते त्या शाळेचेच विद्यार्थी होते. लहानपणी अत्यंत अभ्यासू म्हणून ते प्रसिध्द होते.
हे हेडमास्तर गिम्होणे येथे रहात; परंतु दापोलीस कथाकीर्तनासाठी रात्री हातात कंदील घेऊन बरोबर म्हातारी सावत्र आई येऊन यावयाचे. रामनवमीच्या नऊ दिवसांच्या उत्सवात ते रोज रात्री २-२ । । मैल यावयाचे. मलाही कथाकीर्तनाचा फार नाद असे. हेडमास्तर व मी समोरासमोर बसत असू. एकदा माझ्या शेजारची कीर्तनासाठी येणारी मंडळी तपकीर ओढीत होती हेडमास्तरांनी मला विचारले, 'तूही ओढलीस का ?' मी म्हटले, 'नाही' ते ऐकून त्यांना समाधान झाले.
हेडमास्तर शिस्तीचे भोक्ते होते. त्यांना एक दिवसही कधी उशीर झाला नाही. पावसाळयात कितीही मुसळधार पाऊस असो. हेडमास्तर ठरल्या वेळी शाळेत हजर असावयाचे. या थोर हेडमास्तराच्या हाताखाली प्रत्यक्ष फारसे शिकण्याची संधी मला मिळाली नाही. कारण ते सातव्या इयत्तेत शिकवीत. मी दापोली पाचव्या इयत्तेनंतर सोडली; परंतु एखादे शिक्षक गैरहजर असले किंवा बरेच दिवस रजेवर असले तर हेडमास्तर आम्हास शिकवावयास येत. जादा काम इतर शिक्षकांवर लादण्यापूर्वी ते स्वत:वर लादून घेत.