श्याम 6
गोविंदा :- काम करु लागले म्हणजे आपोआप सारे समजू लागते. चर्चा ह्या पुष्कळ वेळा निरुपयोगी असतात.
राम :- मग ठरले ना श्याम ? आज रात्रीपासून सुरु होऊ दे रामायण.
श्याम :- होऊ देत सुरु भाकडकथा.
नामदेव :- श्याम ! तू आमची अशी टिंगल रे का करतोस ? आमच्या भावना का दुखावतोस ? असतील तुझ्या भाकडकथा व रडकथा. आम्हांला त्या गोड आहेत, पवित्र आहेत.
श्याम :- बरे, मी असे पुन: बोलणार नाही. परंतु कोणत्याही गोष्टीस अवास्तव महत्त्व देऊ नये. माझ्याजवळ बोलता हे ठीक. परंतु बाहेर जगात असे म्हणाल तर फजीत व्हाल, समजले ना ?
राम :- चला रे आता जाऊ; श्यामला आता विश्रांती घेऊ दे. त्याला दिवसा त्रास नका देत जाऊ; रात्री त्याला बोलावे लागेल आणि एखाद्या वेळेस सांगता सांगता जर भावना फारच उचंबळल्या तर त्याला मागून पुष्कळच गळल्यासारखे होईल. श्यामला जपून लुटा. गाईला वाचवून तिचे दूध प्या.
नामदेव :- गाडी धीरे धीरे हाक । बाबा धीरे धीरे हाक.
श्यामकडे प्रेमाने भरलेल्या डोळयांनी पहात ते सारे मित्र कामाला निघून गेले. श्यामही क्षणभर डोळे मिटून पडला व नंतर 'गाडी धीरे धीरे हाक' हेच गाणे गुणगुणत त्या आराम-खुर्चीतच झोपी गेला.