श्याम 125
मी आनंदाने व कृतज्ञतेने माघारा वळलो. मला उपदेशाचे लोटे पाजीत ते बसले नाहीत. काही एक अधिक उपदेश न करण्यातच सारा उपदेश येऊन गेला. उपदेश न केल्याने त्यांनी मला माझी किंमत दाखवून दिली. अधिक सांगण्या-सवरण्याची आवश्यकता नाही, तू सुज्ञ आहेस. तुझ्यावर मी विश्वास टाकतो, ते सारे त्यांच्या न बोलण्यात होते. कधी मौनच अत्यंत प्रभावशाली व कर्तृत्वपूर्ण असते. हेडमास्तरांनी कोणत्याही अटी माझ्यावर लादल्या नाहीत. सशर्त क्षमा एकप्रकारे विद्रूप दिसते. ती बाजारी क्षमा होते. क्षमेचे मंगलत्व व महती पूर्ण मोकळेपणात आहे. क्षमा म्हणजे प्रसन्न व उदार हृदयाचा सहजोद्गार आहे. सहज धर्म आहे.
मी माझ्या वर्गात जाऊन बसलो. दुस-यात तासाला मी वर्गात आलो. त्याचे माझ्या वर्गबंधूंस आश्चर्य वाटले. ते माझ्याभोवती गोळा झाले. 'दिली का रे त्यांनी तुला परवानगी ? इतक्या लवकर देतील असे वाटले नव्हते.' वगैरे ते बोलू लागले. एक मुलगा म्हणाला, 'श्याम ! मघा तू उभा राहिलास. आपल्या वर्गाचे नाव राखलेस. तू हात वर केलास त्या वेळेसच हेडमास्तरांचे डोळे प्रेमाने व क्षमेने चमकले. त्या वेळेसच मी समजलो की, राग मावळला आहे; परंतु शिस्तीसाठी म्हणून तुला त्यांनी 'जा' सांगितले.'
हे असे अनपेक्षित प्रकरण मध्यंतरी जरी झाले तरी सर्वांनी एक मार्क लावायचा हा जो आमचा ठरलेला निश्चय त्यात आम्ही बदल केला नाही. शेवटच्या तासाला ते गणितशिक्षक पुन्हा आले. शेवटचा तास संपत आला. ते वर्गनायकाला म्हणाले, 'कॅटलॉग काढा.' वर्गनायकाने मुकाटयाने काढून दिला. शिक्षक मार्क विचारु लागले. पहिला नंबर म्हणाला, 'एक' दुस-याने त्याचीच री ओढली. तिसरा त्याचाच अनुयायी झाला. चौथाही कच्चा निघाला नाही. पाचवा तरी मागे का राहील ? प्रत्येकाच्या तोंडातून 'एक, एक, एम,' असेच शब्द निघत होते. शिक्षक चकित झाले. त्यांची लेखणी थबकली. ते आमच्याकडे पाहू लागले. क्षणभर ते काहीएक बोलले नाहीत. नंतर त्यांनी विचारले, 'सर्वजण एक मार्क लावणार !'
मुले म्हणाली, 'हो.' त्यांनी पुन्हा विचारले, 'फी माफ असलेली मुलेही असेच करणार का ?' फी माफ असलेला एक विद्यार्थी उभा राहिला व म्हणाला, 'गुरुजी ! सारी मुले एकेक मार्क लावीत असता आमच्या मार्कांचे महत्त्व ते काय राहिले ? चढाओढ असेल तर मार्कांना अर्थ आहे. आम्हालाही स्वाभिमान आहे. आम्ही गरीब आहोत, एवढयासाठी आमचा स्वाभिमान तुम्ही मारु नये, आमच्यावर सूड धरु नये. मार्क देण्यात जो हेतू आहे तो आम्ही दोघांतिघांनी मार्क लावण्याने थोडाच सिध्दीस जाणार आहे. माफीचे विद्यार्थी तर अभ्यास करतातच ! त्यांना इतर आमिषे नकोत. आम्ही अभ्यास न करु तर आमची माफीच टिकणार नाही. तुम्ही सक्तीच केलीत तर आम्ही मार्क लावू. आम्ही तुमच्या ताब्यात आहोत.'
त्या मुलाच्या शब्दांचा परिणाम शिक्षकांवर झाल्याशिवाय राहिला नाही. गरीब मुले गरीब आहेत एवढयासाठी आपल्या शिस्तीच्या वरवंटयाखाली त्यांना तेवढे भरडावे असे त्यांना वाटले नाही. ते म्हणाले, 'दररोज मार्क लावणे तुम्हास पसंत नाही; परंतु तुम्ही अभ्यास करीत नाहीत म्हणून हे माझ्या मनात आले. तुम्ही काही आता लहान मुले नाहीत. तुम्ही स्वत:चे कर्तव्य ओळखले पाहिजे. मी मार्क मांडण्याचे रहित करितो; परंतु तुमच्या चांगुलपणावर श्रध्दा ठेवितो.'
इतक्यात शाळा सुटल्याची घंटा झाली. शिक्षक प्रसन्न मनाने निघून गेले. आपला विजय झाला, असे आम्हाला सर्वांना वाटले. त्या शिक्षकांबद्दलची आमच्या मनातील अढीही पुष्कळशी नाहीशी झाली. परस्परांयी हृदये न समजल्यामुळे गैरसमज वाढतात. To understand is to forgive. समजावून घेणे म्हणजे क्षमा करणे होय. कोणाचाही हेतू नीट समजावून घेतला म्हणजे त्याच्यावर आपण कोपणार नाहीच; तर त्याला क्षमाच करु.
अशा रीतीने आमचे शालेय जीवन चालले होत. सारेच ते सांगत बसेन तर संपता संपणार नाही. त्या सर्व गतगोष्टी आठवण्यात मला एक प्रकारचा आनंद वाटतो; परंतु ते सारे पुराण ऐकण्यात तुम्हाला गंमत वाटेलच असे नाही. माझ्या जीवनात त्या वेळेस एक प्रकारचा रंग व गंध भरला जात होता, हे मात्र खरे. तो सुरंग होता की सुगंध होता, ते मी काय सांगू ? दिसावयास लहान दिसणा-या त्या घडामोडींचा माझ्या संस्कारक्षम मेणासारख्या मनावर फार परिणाम होत होता; आणि म्हणूनच ते सारे सांगताना एक प्रकारची अपूर्व संवेदना मी अनुभवीत आहे.