Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 82

आणि पत्राचा अंत 'आपल्या चरणाची दासी' या शब्दांनी मी केला. मी हे सारे अक्काला वाचून दाखविल्यावर ती लाजली व हसली. ती म्हणाली, 'श्याम, किती रे सुरेख लिहितोस ? तुला हे कोणी शिकविले ?'

मी म्हटले, 'रामायण महाभारतातील गोष्टींनी.'

अक्काचे यजमान अक्काला भेटावयास आले. मी त्यांना विचारले, 'तुम्हाला अक्काचे पत्र आवडले का ?' हसून त्यांनी माझ्या पाठीत थापटी मारली. त्यांनी विचारले, 'का रे ?'

मी म्हटले. 'ते पत्र मी लिहिले होते. अक्का तर नुसती मजकूर सांगे. सारा वृतान्त मनात नीट जुळवून मीच लिहीत असे.' अक्काच्या नव-याबरोबर मी फिरावयास जात असे. त्यांना पायरे शेतावर मी नेले. त्यांना तेथील विहीर दाखविली. एक दिवस वालाच्या शेंगाचा लोटा भाजला. पुष्कळ मजा आली.

उन्हाळयाचे दिवस आले. गावातील मुलांत मी मिसळू लागलो. त्यांना मी क्रिकेट शिकविला. गावात चिंध्यांचे चेंडू घरोघर बनू लागले. शिंप्याकडच्या चिंध्या सार्थकी लागू लागल्या. मुले चिंध्या घेऊन जात व चेंडू बनवीत. देवदारी खोक्याच्या फळयांच्या बॅटी बनू लागल्या. दुपारची जेवणे झाली की, शनिवारी, रविवारी आम्ही क्रिकेटचा धुडगूस घालीत असू. मी माझ्या पूर्वीच्या मित्रांना पुण्या-मुंबईच्या गोष्टी सांगितल्या. माझे इंग्रजी ज्ञानही त्यांना मी दाखवीत असे. 'जोशी यांचे इंग्रजीत रे काय ?' गोंधळेकर याला इंग्रजीत काय रे शब्द ?' वगैरे प्रश्न मुले मला विचारीत. मी त्यांची नावे लिहून दाखवावयाचा. यस, नो, रेडी, आऊट, बाऊंडरी, ओव्हरबॉल वगैरे शब्द क्रिकेट खेळताना त्यांना पाठ झाले.

मी उन्हातून खूप हिंडू-फिरु लागल्यामुळे माझे डोळे पुन्हा बिघडले. आईने धोक्याची सूचना दिली. मलाही भय वाटले. डोक्यावर लोणी व एरंडाचे पान आई ठेवू लागली. पायांना गाईचे दूध रोज रात्री चोळू लागली. थंडसा कांदा सकाळी भाजून खाऊ लागलो. आईचे माझ्यावर प्रेम आहे, असे माझ्या अनुभवास येऊ लागले. वेडा श्याम ! अरे, आईचे प्रेम का कधी मुलावर नसते ! उलट खोडसाळ मुलाचीच आईला जास्त चिंता असते. आईच्या प्रेमाची तुला शंका तरी कशी आली !

आजोबा मला थोडीथोडी वेदविद्या शिकवू लागले. सौर, त्रिसुपर्ण, वैश्वदेव मी पाठ केले. रुद्राचीही संथा घेतली. आजोबा मला याज्ञिक करु पहात होते. आजोबांनी पदांपर्यंत म्हटले होते. वेदातील प्रत्येक शब्द संधी सोडवून पाठ करतात; त्याला पदापर्यंत म्हणणे म्हणतात. आजोबांचा हा उद्योग सुरु झाला तर वडिलांचा दुसरा उद्योग सुरु झाला. इंग्रजी शिकावे, असे वडिलांना वाटत होते. दापोली येथे इंग्रजी हायस्कूल होते. तेथे माझी आत्या रहात होती. आत्याकडे मी रहावे, अशी ते खटपट करीत होते. आत्याकडे दर वर्षाला एक खंडीभर भात द्यावयाचे व मी तिच्याकडे जेवावयाचे असे ठरले. फी वगैरेचा खर्च वडील निराळा देणार होते. दापोली गाव पालगडपासून सहा कोसांवर होते. कोर्ट-कचेरीच्या कामासाठी वडील वरच्यावर तेथे जात असत. ते माझी विचारपूस नेहमी करु शकले असते.

शेवटी मी दापोलीस इंग्रजी शिकण्यासाठी रहावे, असे नक्की ठरले. 'दापोलीची इंग्रजी शाळा जूनमध्ये सुरु होताच तुझे नाव घालावयाचे' असे मला वडील म्हणाले. मी आईचा आजोबांचा, अक्काचा, सर्वांचा आशीर्वाद घेऊन १९१२ च्या जून महिन्यात दापोलीस गेलो. आई मला एकच शब्द बोलली. 'श्याम, आता तरी नीट रहा हो.' आईच्या त्या लहानशा वाक्यात केवढा अर्थ होता ! ते शब्द जळजळीत निखा-याप्रमाणे माझ्या डोळयांसमोर मी सदैव ठैविले होते आणि सदैव ठेवीन.

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148