श्याम 102
"आपण बसू एके ठायी
तुझे पाय माझे डोई'
असे गहिवरत म्हणून दिगंबर आईच्या पायावर डोके ठेवावयाचा.
दिगंबर नेहमी फिरतीवर असावाचा. तो फिरतीवर असला म्हणजे त्याची आई धड खायची नाही, प्यायची नाही. दिगंबराच्या आईकडे मी पुष्कळ वेळा जायचा. सकाळी फुले वेचली की, दिगंबराच्या आईस मी थोडी द्यावयाचा. संकष्टी चतुर्थीला, सायंकाळी एकवीस दुर्वांची जुडी तिला मी नेऊन द्यावयाचा. दिगंबर घरी नसला म्हणजे त्याच्या आईला सोबत म्हणून मी निजावयास जावयाचा.
मला गार वारा आवडत असे. मी दारात डोके ठेवून निजावयाचा. दिगंबराची आई म्हणे 'श्याम ! अंथरुण खाली घे. दार नको का लावावयास.' मी म्हणावयाचा 'दिगंबराच्या आईकडे का कोण चोरी करावयास येईल ? दिगंबर म्हणजे ज्याच्या जवळ काही नाही तो.' परंतु मला बोलता बोलता झोप लागली म्हणजे दिगंबराची आई माझे अंथरुण खाली ओढून घेई. दार लावून घेई. सकाळी उठावे तर अंथरुण खाली आलेले !
दिगंबराची आई पहाटे उठून सडासंमार्जन करावयाची. बाहेर जरा गार थंडी पडलेली असली तर दिगंबराची आई उठल्यावर स्वत:ची चौघडी माझ्या अंगावर घालावयाची. दिगंबराच्या आईचा मी कोण होतो ? परंतु आईपासून दूर असलेल्या शाम बद्दल तिला वात्सल्य वाटे आणि श्यामही असा होता की, काही व्यक्तींच्या हृदयात तो घुसावयाचाच.
दिगंबराची बहीण होती. तिचे नाव गंगू. गंगूचे लग्न झालेले होते. गंगू माहेरी यावयाची होती. दिगंबराची बहीण येणार म्हणून दिगंबराला आनंद झाला त्यापेक्षा मला झाला. दिगंबराची तर तिन्ही लोकी फेरी असावयाची. त्याची नेहमी भ्रमंती व फिरती. बहिणीच्या येण्याचा आनंद त्याला थोडाच लुटता येणार होता ! बहीण येणार दिगंबराची; परंतु आनंद लुटणार होता श्याम.
गंगू माझ्यापेक्षा एकदोन वर्षांनी फार तर मोठी असेल. मी तेरा-चौदा वर्षाचा होतो. गंगू पंधरा-सोळा वर्षांची असेल. आली, एकदाची गंगू आली. हळूहळू गंगूची व माझी ओळख झाली. दिगंबराची आई गंगूला सांगावयाची. 'श्यामला हाक मार' गंगू 'शाम शाम' अशी हाक मारी. दिगंबराच्या आईला मी बाजारातून सामान आणून देत असे. कधी नारळ आण, कधी शेंगाचे दाणे आण, कधी गूळ आण असे काम असे. माझ्यावर प्रेम करणा-या दिगंबराच्या आईसाठी मी काहीही करावयास तयार असे.
गंगूसाठी दिगंबराच्या आईने नारळीपाकाच्या वडया केल्या होत्या. एके दिवशी सायंकाळी मी शाळा सुटून घरी आलो. गंगू दारातच होत. 'शाम ! शाम !' तिने हळूच हाक मारली. मी गेलो व विचारले, 'काय ग गंगू ?'