श्याम 18
'मामांनी आणले नाही, मग मी काय करणार ? मला तुझी किती आठवण येत होती ! तुला येत होती माझी ?' मी विचारले.
'हो तुला मी खाऊ घेऊन काल आलो होतो. हा बघ अजून ठेवला आहे.' असे म्हणून अहंमदने मला मोठे बिस्कीट दिले. मी बिस्कीट खात जात होतो.
'काय रे खातोस श्याम ?' मामांनी विचारले.
'बिस्कीट अहंमदने दिले.' मी म्हटले.
'अरे दुस-याजवळचे घेऊन खाऊ नये.' मामा म्हणाले.
'अहंमद चांगला आहे मामा. मी त्याला कविता सांगतो.' मी म्हटले.
अहंमद मामांचा विद्यार्थी होता. अहंमदचे अंतरंग मामांना थोडेच समजले होते ! परंतु या लहान श्यामला अहंमदची नाडीपरीक्षा झाली होती. एके दिवशी मीही अहंमदसाठी घरुन जरदाळू आणला होता. मी तो अहंमदला देऊ लागलो; परंतु अहंमद म्हणाला, 'तू लहान आहेस. तूच खा.'
'तूही थोडा घे.' मी त्याला म्हटले.
'श्याम ! तू वरचा भाग खा. आतील बी मला दे.' अहंमदने तडजोड केली.
अहंमद आतील बी मागत होता. त्याला वरचा भाग नको होता. त्याला अंतरंग पाहिजे होते. या श्यामचे गोड अंतरंग त्याला पाहिजे होते.
कधी कधी मी शाळेत जाताना फराळाचा लहान डबा घेऊन जात असे. एके दिवशी मी मामांना मधल्या सुटीत म्हटले, 'मामा ! मी अहंमदजवळ जाऊन फराळ करु ? जाऊ का त्याच्याकडे माझा फराळाचा डबा घेऊन ? त्या झाडाखाली बसून आम्ही दोघे खाऊ, जाऊ का मामा ?'
'त्या अहंमदजवळचे का खाणार ?' मामा रागाने म्हणाले.