श्याम 99
काही लोक म्हणतील, 'सारे प्रगट करण्यात औचित्य नाही. मनुष्य उघडानागडा समोर उभा करण्यात सदभिरुची नाही. त्याप्रमाणे सारा देह कापडाने आच्छादण्यातही मौज नाही. अंग थोड झाका, थोडे उघडे ठेवा; त्यावरुन आकाराची कल्पना करता येईल आणि त्या कल्पनेत गोडीही आहे. मिटलेली कळी असेल तर तिचे अंत:सौंदर्य समजणार नाही; परंतु कळी अगदी पाकळीन् पाकळी उघड करुन जर समोर ठेवली, तर त्यातही शोभा नाही. अर्धस्फुट सुमनाचे सौंदर्य काही और आहे. अर्धस्फुट स्मिताचे रमणीयत्व एक न्यारेच आहे. सूर्य पुरा वर आला नाही. अद्याप डोंगराच्या पलीकउे आहे. अशा त्या उष:काळातील गोडी व सौंदर्य प्रकट सूर्योदयात नाही. सारा देह फाडून ठेवला तर आपणास पाहवणार नाही; त्याप्रमाणे फोडून फोडून सारा अर्थ उघड करुन ठेवला तर त्यात तरी काय माधुरी ? अर्थाचे थोडे तोंड दिसावे, थोडे न दिसावे, यातच खरी गंमत आहे. लहान मूल ज्याप्रमाणे दाराआड उभे राहून डोकावते, पुन्हा लपते, त्याचप्रमाणे कलेतील अर्थमूर्तीने करावे.'
जाऊ दे, वाद सदैव चालायचेच. या सर्व गोष्टींना मर्यादा पाहिजे, प्रमाण पाहिजे, एवढाच यातील अर्थ. प्रमाणबध्दतेत शोभा आहे. फार मुग्धताही नको व फार वाचाळताही नको. केशवराव या सर्व वादांशी आमचा परिचय करुन देत असत. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. काव्याची गोडी खरी त्यांनी दिली. काव्य चाखावयास त्यांनी शिकविले.
केशवराव मराठी कविताही आम्हाला शिकवीत असत. वामनी श्लोक व मोरोपंती आर्या त्यांनी शिकविल्या. वामन व मोरोपंत यांची तुलना करुन दाखवावयाचे. वामनपंडित कोठे कोठे शंभरापैकी ९० मार्क मिळवितात, तर कोठे कोठे शंभरापैकी दहाही त्यांना देता येणार नाहीत; परंतु मोरोपंतांचे तसे नाही. मोरोपंतांना सर्वत्र शेकडा पन्नास मार्क आहेतच, पन्नासांपेक्षा कमी ते कोठेच घेणार नाहीत. कोठे कोठे पन्नासांपेक्षा जास्त घेतील. यामुळे मोरोपंतांच्या मार्काची बेरीज वामनांच्या मार्कापेक्षा नेहमी जास्तच असणार.
वामनांचे लोपामुद्रासंवाद हे आख्यान त्यांनी आम्हास शिकविले.
सजल-जलद-संगे मोर गे का न नाचे ।।
असा एक चरण त्या आख्यानात आहे. केशवराव म्हणाले, 'सजल जलद आहे. कोरडा जलद काय कामाचा ? कोरडा मेघ पाहून मोर नाचणार नाही, पाण्याने ओथंबलेला जलद पाहून मोर पिसारा उभारतील.'
'पथी मागे मागे परम अनुरागे रघुपती
उभा राहे पाहे'
या चरणातील सहृदयता किती अपूर्व आहे, ते केशवरावांनी अभिनयपूर्वक दाखविले.
"हरि देशमुख ऐशामाजि मेला मला गे'