श्याम 16
३. माझा पहिला मुसलमान मित्र
माझे डोळे बरे झाले. मी हसत खेळत, रुसत, रागावत, शिकत होतो. परंतु मी आजारी पडलो. मला ताप येऊ लागला. मामा जरा घाबरले. धाकटे मामा रजा घेऊन घरीच एक आठवडाभर राहिले. माधवराव येत असत. रात्री माधवराव मधून-मधून पहारा करीत. त्यांचा हात माझ्या हातात घेऊन मी पडून राहत असे.
हळूहळू तापाला उतार पडला. सर्वांच्या जिवात जीव आला. दोघे मामा पुन्हा कामावर जाऊ लागले. ते कामावर जाऊ लागले म्हणजे माझे डोळे भरुन येत असत. धाकटे मामा मला कुरवाळीत म्हणावयाचे 'श्याम, पडून रहा. अजून हिंडू नको. मी लवकर संध्याकाळी येईन. येताना डाळिंब आणीन.' मी मामांचा हात सोडीत नसे. परंतु आपला हात सोडवून मोठया कष्टाने ते निघून जात.
मामा गेले म्हणजे मी मुसमुसत असे. मामी रागे भरे. ती म्हणायची 'असे रडणे चांगले नाही. नसते दुखणे अशाने यायचे.' या शब्दांनी माझे रडणे थांबण्याऐवजी उलट वाढे मात्र. मामी शक्य तेवढी माझी काळजी घेई, माझे कपडे रोजच्या रोज बदली. अंथरुणावरची चादर दोन-तीन दिवसांनी धुई किंवा डाळिंबाचे दाणे काढून बशीत ठेवी. मोसंब्याच्या फोडी सोलून देई. सारे ती करी; परंतु ती जे करी त्यात ओलावा नसे, कर्तव्य करावयाचे या बुध्दीने ती करी; परंतु त्यात प्रेम नसे. माझ्या हृदयाला ती ओढू शकली नाही. आईचे प्रेम, बहीणभावाचे प्रेम, मावशीचे प्रेम, मामी देऊ शकली नाही. कठीणच आहे ती गोष्ट. दुस-याच्या मुलावर पोटच्या पोराप्रमाणे माया करता येणे ही गोष्ट सोपी नाही.
ज्या कर्तव्यात हृदयाचा जिव्हाळा ओतलेला नाही ते कर्तव्य कितीही चांगल्या प्रकारे केले तरी जगाला जिंकू शकणार नाही. कितीही कसोशीने व कौशल्याने सोन्याचे फूल तयार केले तरी त्याला वास का येईल ? त्याच्यात रस का मिळेल ? ते फूल मौल्यवान असेल तरी निर्जीव होय.