श्याम 17
अमेरिकेत वाल्ट व्हिटमन म्हणून प्रख्यात कवी होऊन गेला. माझा तो आवडता कवी आहे. त्याच्या कवितांना तृणपर्णे हे नाव आहे. व्हिटमन रोग्यांच्या दवाखान्यात जावयाचा. १८६१ मध्ये गुलामगिरी बंद करण्यासाठी अमेरिकेत युध्द झाले. लढाईत जखमी झालेल्या शिपायांची व्यवस्था दवाखान्यातून होई. त्या दवाखान्यातून व्हिटमन हिंडावयाचा. डॉक्टरांपासून कडू कडू औषधे घेण्यास ते जखमी शिपाई तयार नसत; परंतु व्हिटमनने विष दिले असते तरी ते त्यांनी घेतले असते. व्हिटमन आला म्हणजे सूर्यप्रकाश आला असे त्यांना वाटे. व्हिटमन कोणाला गुलाबाचे फूल द्यावयाचा, कोणाचे पत्र लिहावयाचा; कोणाचे अंथरुण साफ करावयाचा, कोणाला धीर द्यावयाचा, कोणाच्या केसांवरुन हात फिरवावयाचा. व्हिटमनला पहाणे म्हणजेच निम्मा रोग बरा होणे. व्हिटमन आपल्याबरोबर प्रेमाचे अमर रसायन घेऊन येत असे.
वस्तूवर प्रेमाचे किरण पाडा म्हणजे ती सुंदर दिसेल. अंतर्बाह्य सुंदर दिसेल. हातरुमालावर ज्याप्रमाणे अत्तराचा थेंब टाकतात, त्याप्रमाणे प्रत्येक कृतीवर हृदयातील प्रेमाचे अत्तर ओतीत जा; म्हणजे प्रत्येक कृतीला सुवास येईल.
मामीला ही कला साधलेली नव्हती. ती सारे करी; परंतु ते करुन न केल्यासारखे होई. पुढे पुढे मी मामाबरोबर शाळेत जाण्याचा हट्ट धरु लागलो. 'मामा ! न्या ना मला शाळेत, मी तुमच्या वर्गात निमूटपणे बसेन.' असे रडत रडत मी म्हणावयाचा. शेवटी मामांना कीव येई, कळवळा येई व मला शाळेत घेऊन जात.
मी मामांच्या शाळेतील मुलांत मिसळून गेलो. मी लहान असल्यामुळे सारी मुले माझे कौतुक करीत. इंग्रजी दुसरीचा तो वर्ग होता. मी अहंमदच्या जवळ बसत असे. अहंमदच्या पायात विजार असे. अंगात मोठा अंगरखा असे. डोक्याला लाल गोंडयाची टोपी असे. अहंमदजवळ मी बसावयाचा, गोष्टी बोलावयाचा. अहंमद मला चित्रे आणून द्यावयाचा. मधल्या सुट्टीत भोवरा फिरवावयास मला शिकवावयाचा. मराठी कवितांतील अर्थ कधी कधी अहंमद मला विचारी. त्याला हंसकाकीय कथानक होते. माधवरावांनी ते माझ्याजवळून वाचून घेतले होते. अहंमदला मी अर्थ सांगावयाचा. अहंमद हसून मला म्हणे, 'श्याम ! तुला अर्थ येतो व मला रे कसा येत नाही ?'
मी त्याला म्हणे, 'तुझ्या मुसलमानी कविता तरी मला कोठे समजतात ? या आमच्या कविता म्हणून मला समजतात, अहंमद ! मला एखादे मुसलमानी गाणे शिकवशील का रे ?'
अहंमद म्हणे, 'हो, परंतु तुला आवडणार नाही.'
मी म्हणे, 'आवडेल. अहंमदाचे मला सारे आवडते.'
एखाद्या दिवशी मामा मला शाळेत नेत नसत. मग मला फार वाईट वाटे. मला अहंमदाची व त्याच्या त्या लांब अंगरख्याची सारखी आठवण येत असे.
'श्याम ! काल तू शाळेत का आला नाहीस ?' अहंमद मला एके दिवशी म्हणाला.