शेवटी सारे गोड होतें 7
सकळहि जाऊ अंती प्रभुच्या चरणाशी खास
जीवन होइल सुंदर सखया होई न निराश।।
हे मन्नाथा त्रिजगन्नाथ प्रभु सर्वां पाळी
सकल जगाची तया काळजी चिंता तूं टाळी।।
वादळ येते परि ते जाते नभ निर्मळ होई
शांत चंद्रमा पुन्हां अंबरी मिरवत तो राही।।
हृदयाकाशामधले वादळ शांत तेविं होई
सत्त्वाची सौदर्याची ज्योत्स्ना पसरुन मग राही।।
घनदाट धुके अधिमधि येउन दिनमणिला लपवी
पटल मिटून प्रकटे पुनरपि अखिल मही सुखवी।।
मोह धुके हे विरते तेवि ज्ञानमित्र येई
प्रेमाचे शुभकिरण पसरुनी पावनता देई।।
दु:ख असे हें सान्त तसेची मोह सर्व सान्त
एके दिवशी मोह गड्या हे मरतिल निभ्रान्त।।
रडुनी रडुनी उपनिषदें तीं नाथ शिकूं गाया
रडुनी रडुनी, आपण जिंकूं नाथ मोहमाया।।
झोंप सख्या तूं शांत नसो ती चिंता चित्तांत
उठो उदइक प्रभु मम होउन शांत हृदयकांत।।
ग्रहणापासुन मुक्त जाहल्या चंद्रसम साजो।।
प्राणसख्याला माझ्या पाहुन पापताप जावो।।
देवा माझा ठेवा आतां हा न कधी न्यावा
आम्हां दोघांचा प्रभु आतां जन्म सफळ व्हावा।।