जगन्नाथ 10
हळूहळू मुली आल्या, काही बायकाहि आल्या; काही मुलेहि येऊन बसली. जरा लांब काही पुरुषमंडळीहि बसली. काही गोष्टी त्यांच्याहि कानांवरून जात. आज एक पाहुणा व निराळ्या वेषांत आलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले.
“नीट बसा सारी रोजच्यासारखी.” कावेरी म्हणाली.
एक मोठी बाई एक मुलगी, एक मोठी बाई एक मुलगी अशी ती सारी बसली; मंडलाकार बसली.
“असे का बसवतां?”
“मोठ्या बाया एकीकडे बसवल्या सा-या तर त्यांना आपण बयाने मोठ्या असे वाटते. जणुं निराळ्या झालो, आपणांस या मुलींप्रमाणे येणार नाही असे वाटते. परंतु मुलींच्याजवळ असल्या म्हणजे त्याहि जरा लहान होतात, हसतात.” कावेरीने पाहुण्यांची ओळख करून दिली. ते वंदे मातरम् म्हणणार आहेत, तिने सांगितले. एकदम सारी उभी राहिली. दूर बसलेलेहि उभे राहिले. कावेरी उभी राहिली. तिच्या शेजारी जगन्नाथ उभा राहिला. वंदे मातरम् गीत सुरू झाले. किती सुंदर आवाज, किती भावपूर्ण म्हणणे!
“वंदे”—“मातरम्”, “भारत माताकी”—“जय” असे जयघोष झाले.
“तुम्ही बसतां का घरी जायचे? आज सुटी देते यांना.”
“शिकवा तुम्ही. मी पाहीन, ऐकेन. तामीळ शब्द ऐकेन. अंदाजाने शिकेन.”
“बसा तर या आसनावर.”
जगन्नाथ बसला. वर्ग सुरू झाला. परंतु आज वर्ग सुरू व्हायचा नव्हता. एकदम वादळ सुटले. जोराचा वारा. धूळ व कचरा डोळ्यांतून जाऊं लागला आणि आकाशहि भरून आले. मेघांनी ओथंबले.
“पाऊस येईल. तुम्ही मग भिजाल.” मुली म्हणाल्या.
“आज बंदच करूं.” कावेरी म्हणाली.