येथें नको, दूर जाऊं 4
“कां?”
“त्यांना तो वाडा पाहिजे आहे.”
“परंतु का?”
“अरे त्यात धन आहे. पुरलेले ठेवणे आहे, असे लोक म्हणतात. म्हणून तुझा दादा अधीर झाला आहे.”
“बाबा, धन असते तर रामरावांनीच नसते उकरून पाहिले?”
“जाऊ दे रे. जगन्नाथ, तू या भानगडीत पडू नकोस. मनाला लावून घेऊ नकोस.”
“नाही, असें नाहीं. मी इतर भानगडींत पडणार नाही. परंतु ही भानगड माझ्या मित्रांच्या घरची आहे. गुणाचे दु:ख मला पाहवणार नाही. तुम्ही फिर्याद काढून घ्या. नाहींतर मी अन्न वर्ज्य करीन. मी उपवास सुरू करीन.”
“काही तरीच तुझें.”
“मी मनांतील सांगितले. तुमचे पाय धरून सांगितले.”
“बरे बघेन मी.”
आणि पंढरीशेट वडील मुलांजवळ बोलले. ते कोणीहि ऐकायला तयार होत ना. “करूं दे उपवास. म्हणे उपवास करीन. मोठा गांधीच की नाहीं उपवास करायला. करील दोन दिवस व जोवील तिस-या दिवशी. असे जर पदोपदी तो अडवू लागला तर कसे व्हायचे? ही रोजची पीडा होऊन बसेल.” असे ते दोघे भाऊ म्हणाले.
“परंतु सध्यांच फिर्याद नाही करीत; काढून घेतो काही दिवस; असे सांगू त्याला.” पंढरीशेट म्हणाले.