दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 2
“काय रे, दाणे विकत घ्यायला पैसे आहेत. सरकारचें देणे द्यायला मात्र पैसे नाहींत ना?”
“अहो, हा रुपया? घरांतील सर्वांना आठ दिवस चरख्यावर कांतलें. तें सूत दिलें येथें खादी भांडारांत व रुपया मिळाला. पोरें चार दिवस उपाशीं आहेत.”
“रुपया मिळाला तो आधीं सरकारला कां दिला नाहींस? तुम्ही सरकारहून मोठे झालांत वाटतें?”
“सरकारहून मोठे कसे होऊं दादा? त्याच्या राज्यावर देव कधीं मावळत नाहीं.”
“तुझ्या घरावर जप्ती आणायला हवी. ते चरखे जप्त करायला हवेत. चरखे तुम्हांला शिरजोर करीत आहेत. मला फसवलेंस का रे?”
तो तलाठी गेला. त्या शेतक-यास वाईट वाटलें. असें कसें हें सरकार? उपाशीं मरणा-या लोकांची काडीइतकी पर्वा न करणारें सरकार! मामलेदार पगार घेतोच आहे, कलेक्टर घेतोच आहे. यांना हे पगार घेववतात कसे? लोकांसाठीं हे काय करीत आहेत? आणि खादीवालें, काँग्रेसवाले, ग्रामोद्योगवाले धंदा देत आहेत, चरखे पुरवीत आहेत, थोडा आधार व आशा देत आहेत. ते चरखे कां यांनीं जप्त करावे? त्या कामांत मदत करण्याऐवजीं, त्या कामाला उत्तेजन देण्याऐवजीं त्यांत का हे विघ्न आणणार? अरेरे! असे कसे हे लोक?
तो शेतकरी घरीं गेला. त्यानें दाणें नेले होते. मुलांना भाकर झाली. सर्वांना आनंद झाला. चरखा भगवानाला त्यांनीं नमस्कार केला. त्याची बायको चरख्याला नमस्कार करून रोज कांतायला लागत असे. अन्नदाता परमेश्वर तो होता.
एके दिवशीं तो शेतकरी, त्याची बायको व मुलें कांतीत बसलीं होतीं. आणि पोलीस आले, तलाठी आले, अधिकारी आले. तरी शेतकरी उठला नाहीं. तो कांतीतच राहिला.
“ओढा रे ते चरखे. हरामखोर उठतहि नाहीं. खायला मिळत नाहीं तरी मगरूर—” मोठा अधिकारी ओरडला.
“हे चरखे खायला देतात, म्हणून मगरूरी.” दुसरा कोणी म्हणाला.
“ओढा ते चरखे. बघतां काय?” हुकूम झाला.