इंदु 5
“अशा गोष्टी बोलतच बसू आपण. तुझ्या त्या दयाराम भारतींच्या सांग आठवणी. सारंगी वाजवण्यापेक्षां तुझ्याजवळ बोलतच बसायला मला आवडतें.”
“मी शिकवणीचे पैसे फुकट घेऊं?”
“तू शिकवीतच आहेस मला. किती तरी शिकवीत आहेस. तू त्या दिवशी ती कोजागरी पौर्मिमेची गोष्ट सांगितलीस व मला रात्रभर झोप आली नाही. गुणा, मी तुला श्रीखंडाची वडी दिली, रामरावांना दिली, आणखी कोणाला बरे दिली असेल?”
“कोणाला? मी काय सांगूं?”
“आमच्या रामा गड्याला दिली.”
“खरेच?”
“हो. असे करायला मला कोणी शिकविलें? तूं ना? या शिकविण्याची किती किंमत? गुणा, तुझ्याजवळून मला अशाच गोष्टी शिंकू दे. तुझ्यासारखी सारंगी वाजवायला मला नाही येणार. परंतु तुझ्यासारखी गरिबांविषयीं प्रेम बाळगणारी मला होऊं दे.”
दर रविवारी मनोहरपंतांकडे किंवा विश्वासरावांकडे गाण्याची बैठक असे. तेथे गुणाला जावे लागे. तो लाजे, शरमे. अशा बैठकींतून वाजवणे त्याला आवडत नसे. परंतु आपल्या आश्रयदात्याच्या मनाला दुखवूं नये म्हणून तो त्या बैठकींना जाई. त्याला वाजवण्याचा आग्रह होई. तो संकोच करी. परंतु शेवटी सारंगी हाती घेई. वाजवतां वाजवतां तन्मय होई. त्याचे डोळे आपोआप मिटत. डोळे मिटून तो वाजवी. गुणाच्या तोंडावर त्या वेळेस एक प्रकारची सौम्य प्रभा पसरलेली दिसे. इंदु बघत राही.
“बाबा, डोळे मिटून हे कसे हो वाजवतात? मला डोळे उघडे ठेवूनहि वाजवतां येत नाही.” ती म्हणे.
“खरे गाणे, खरे वाजविणे डोळे मिटूनच साधतें. डोळे मिटूनच आपण आपल्या हृदयाशी एकरूप होतो.” पिता सांगे.
गुणा मॅट्रिकची परीक्षा पास झाला. सर्वांच्या विचाराने तो इंदूरच्या वैद्यकीय कॉलेजांत दाखल झाला. तेथील अभ्यासक्रम संपवून मग थोडे दिवस कलकत्त्यास जाणार होता. निस्रगोपचाराचा अभ्यास संपवून येणार होता.
“तुम्ही आतां चार वर्षे येथेच राहणार.” इंदु म्हणाली.
“हो. येथलाच अभ्यास. येथला डॉक्टर होईन. मग निसर्गोपचार पद्धतिहि शिकून येईन.”
“मानसोपचार पद्धतिहि आहे ना?”