इंदूर 2
“खरेच का? मी त्यांना पाहीन. त्यांच्याजवळ वाजवायला शिकेन. ते एकटेच येणार आहेत?”
“त्यांचे आईबाप बरोबर आहेत. तू जशी आमची एकुलती एक तसे त्यांच्या आईबापांचे ते एकुलते एक.”
“दोघे सारखी, नाही का? मला गाणे आवडते. त्यांना गाणे आवडते. त्यांना गाताहि येते का बाबा?”
“त्यांचा एक मित्र आहे. तो फार छान गातो. परंतु ह्यांना गातां येत नाही. ह्यांची कला बोटांत आहे. अद्ङुत कला. किती तन्मय होतात ते वाजवतांना. तू बघशील.”
“बाबा, ते आपल्याकडेच राहतील का?”
“येतील त्या दिवशी राहतील. त्यांच्यासाठी मी एक जागा पाहून ठेवली आहे. तेथे ते बि-हाड करतील.”
“आपल्याकडे राहिले म्हणून काय झाले?”
“आपल्याकडच्या जागा भरलेल्या आहेत.”
“तसे नाही मी म्हणत. आपल्याकडेसच.”
“त्यांना मोकळे नाही वाटणार इंदु. स्वाभिमानी आहे ती मंडळी घरदार सोडून निघालेली मंडळी. स्वतंत्रपणे राहण्यांतच त्यांना आनंद वाटेल.”
“ते शाळेत जातील, होय ना?”
“मॅट्रिकच्या वर्गात ते होते.”
“मला वाजविणे शिकवतील. गणितहि शिकवतील.”
“तुला गणित येणार नाही. मी थोडे का शिकवायचे करून पाहिले.”
“परंतु त्यांना येईल शिकवता. एकाद्याला येते बाबा.”
“बरे शीक.”
“तुम्ही हसतसे. मी नाही बोलत.”
“तू येणार का स्टेशनवर त्यांना घेण्यासाठी?”
“हो. येईन. केव्हा जायचे?”