इंदिरा 4
“तुम्ही त्यांची समजूत घाला. तुमच्या जाण्याला तरी त्यांची कोठे आहे संमति? परंतु तुम्ही समजूत घातलीत. तशी माझ्याविषयी घाला.”
“बरे बघूं.”
“मला पाहून आतां दु:खी नका होत जाऊ. मी तुमच्या आज येणार नाही. तुम्हांला विघ्न होणार नाही. मी तुमच्या आनंदासाठी आहे. तुमचे समाधान ते माझे हो.”
“इंदिरे, मी असा माणूसघाण्याप्रमाणे वागलो त्याची क्षमा कर. ते विसरून जा. आपण दोघं चांगली होऊं.”
जगन्नाथने एरंडोलमधील काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्यामार्फत वर्ध्याकडे पत्रव्यवहार केला. स्वखर्चाने व घरच्या परवानगीने इंदिरेने येऊन रहावे असे लिहून आले. जगन्नाथला आनंद झाला.
“आई, आम्ही दोघं वर्ध्याला जाऊन येऊ का? महात्माजींचे दर्शन घ्यावे. असे मनांत येते. येऊ का जाऊन?”
“इंदिरेलाहि नेणार आहेस?”
“हो. मी एकटा कसा जाऊ?”
“जा. दोघं जा. मला इतके दिवस काळजी वाटत होती. तूं तिच्याजवळ बोलतहि नसस. घरांत क्षणभर थांबत नसस. कोठे खेड्यापाड्यातून भटकत असस. वाटे पोरीचं काय होणार कुणास कळे! आता जरा हसतोस, आनंदी दिसतोस. चांगलं झालं. दोघं सुखाने संसार करा.”
“मग येऊ का जाऊन?”
“या हो जाऊन. महात्माजींच्या पायां पडून या व संसाराला सुरुवात करा. या जाऊन.”
एके दिवशी जगन्नाथ व इंदिरा दोघं निघाली. इंदिरेला फार आनंद झाला होता. पतीबरोबर प्रथमच ती आज बाहेर पडत होती. एकत्र प्रवास करीत होती.
“तुला तेथे आश्रमांत ठेवून मी परत येणार. आई म्हणेल फसवलंस म्हणून. परंतु सांगेन की तेथले वातावरण इंदिरेला आवडले. ठेवले आहे थोडे दिवस.”
“परंतु मी येईपर्यत तुम्हीं नाही हो जायचं कुठे.”