एरंडोलला घरीं 15
जगन्नाथ कावेरीचें लुगडें धुवी. तिचे कपडें धुवी. तिला चहा करून देई. ते डबा मागवीत. परंतु कावेरीला स्वत:च्या हाताचें करूव वाढण्यांत त्याचा आनंद असे.
“जगन्नाथ, कसें चुरचुरीत लुगडे लागते हाताला. तूं छान धुतोस.”
“परंतु मला चुरचुरीत नाही आवडत. इंदिरा माझे कपडे धुवी. चुरचुरीत आणून देई. परंतु मी ते कुसकरून मऊ करीत असें व मग घालीत असें.”
“तूं इंदिरेला सांग की कावेरीला चुरचुरीत वस्त्र आवडत असे.”
“मी तुला सोडून कुठें जाऊं ?”
“इंदिरा तुला ओढून नेईल. तूं तिचा समुद्र आहेस. माझा वाळूचा बंधारा किती दिवस तुला अडवणार ? हा वाळूचा बंधारा, मिठाचा बंधारा समुद्रांतच मिळून जाईल. समुद्र मग इंदिरेकडे हेलावून. उचंबळून भरती येऊन जाईल.”
प्रेमाचा असा पाऊस पडत होता. आणि त्या प्रेमाच्या पावसांत बाळ वाढत होते. आणि एके दिवशी एका प्रसूतिगृहांत कावेरी प्रसूत झाली. मुलगा झाला. गोरामोरा मुलगा. जगन्नाथ जाई. कावेरीजवळ बसे. किती पावन दिसें ती. शांत दिसे ती. तिचे स्मित आतां उन्मादकारी नव्हतें. तें अनंत अर्थाचे सूचक, शांत व मधुर वाटे. पाळ्ण्यातील लहान बाळाला जगन्नाथ हालवी. त्याच्याकडे बघे.
“घे त्याला हातांत.”
“मला भय वाटतें. त्याला वाढूं दे. तुझ्या दुधावर वाढूं दे. तुझ्या मांडीवर वाढूं दे. मग मी घेईन.
“जगन्नाथ, नवीन कोवळ्या अंकुराची वाढ स्त्रियांनीच करावी. नवीन तुळशीचा माडा, नवीन फुलझाड, नवीन दुर्वा स्त्रियांनीच वाढवाव्या. नवीन बाळाला हळुवार हातांनी त्यांनीच वाढवावें. स्त्रिया वाढवतील तें जगेल. तुमच्या सा-या चळवळी स्त्रियांना वाढवूं दे. कॉंग्रेस, किसानकामगार चळवळ, सा-या चळवळी स्त्रियांपर्यंत पोचल्या पाहिजेत. स्त्रिया वाढवतील ते जगेल बाकीचे मरेल. स्त्रियांचा हात म्हणजे अमृतहात.”
“तुझा तरी हात अमृतहात आहे. कावेरी, आपण बाळाला खांद्यावरून, कडेवरून हिंदुस्थानभऱ नाचवूं. हा बाळ म्हमजे जणुं झेंडा, नव हिंदुस्थानचा झेंडा. आपण गाणी म्हणूं. तो ऐकेल, हंसेल. खरें ना ? बाळाचे नाव काय ठेवायचें ?”
“जगन्नाथानंदम्.”
“अगडबंब नाव.”