इंदूर 11
“काय ग करायचे?” रामरावांनी पत्नीस विचारले.
“मी काय सांगू?”
“निदान जेवायला तरी याच तिकडे. कोठे झोपायचे ते मग ठरवूं. हे देव वाटतें? इंदूरला फुले खूप स्वस्त असतात. पुढे पुढे गुलाबाची फुले दिडकीला २०।२० मिळतात.”
“दिडकीला वीस?” गुणाने आश्यर्याने म्हटले.
“हो वीस. जास्तच. पंचवीससुद्धा मिळतील. तुमच्या देवांना भरपूर वहा फुले. इंदूरला देवांची पूजा तरी छान होईल.”
“सारेच छान होईल.” गुणा म्हणाला.
“आमचे इंदूर चांगले आहे. येथे किती राजवाडे, बागा; येथला दवाखाना केवढा आहे. दूरदूरचे लोक ऑपरेशनसाठी येतात. आणि अहिल्याआश्रम म्हणून सुन्दर संस्था आहे. तुम्ही सारे पहाल. तुम्हांला इंदूर आवडेल.”
“तरी एरंडोलची आठवण येईल.” गुणा म्हणाला.
“ही वाटते तुमची खेली! हा कुणाचा फोटो?”
“माझ्या मित्राचा. माझी आठवण येऊन तो रडत असेल. त्याला न सांगता मी आलो. मी कोठे गेलो आहे हे त्याला माहीत नाही. बाबांची इच्छा आहे की आम्ही कोठे आहोत ते कोणाला कळू नये. याचे नाव जगन्नाथ.”
“आणि हा हार मी दिलेला ना?”
“हो. या फोटोला छान दिसतो नाही?”
“आणि हा जवाहरलालांचा फोटो. त्यांना कोण नाही ओळखणार? आणि हा कोणाचा?”
“हे दयाराम भारती. हे एक मोठे देशभक्त आहेत.”
“मी नव्हते ऐकले त्यांचे नाव.”