इंदु 24
एके दिवशी गुणा असाच तेथे गेला होता. क्षितिबाबू घरांत नव्हते. कुमुदिनी अंथरुणावर होती. तिचा भाऊ अक्षय तेथे होता.
“या बसा.” तो म्हणाला.
“अक्षय, ही मच्छरदाणी वर कर.” कुमुदिनी म्हणाली. सारंगी वाजवून गुणा जाऊं लागला. कुमुदिनीने त्याला जवळ बोलाविले. गुणा जवळ गेला. ती हलक्या आवाजांत म्हणाली, “तुमचा एक सुंदरसा फोटो मला आणून द्या. माझी इच्छा पुरी करा.”
एके दिवशीं त्याने आपला एक फोटो काढून घेतला व कुमुदिनी, तो नेऊन दिला. तो फोटो कुमुदिनी आपल्या हृदयाशी धरी. कुमुदिनी बरी होईल असे वाटत होते. परंतु तिचे दुखणे वाढले.
“बाबा, सारंगीवाल्याला बोलवा. जा लौकर.” ती म्हणाली. क्षितिमोहन गेले. गुणाला घेऊन आले.
“वाजवा सारंगी. आज माझा रोग कायमचा बरा होईल अशा त-हेची वाजवा सारंगी.”
गुणा सारंगी वाजवू लागला. कुमुदिनीने गुणाचा फोटो हृदयाशी धरून ठेवला होता. अक्षय जवळ होता. गॅलरीत गर्दी जमली. आजची सारंगी काही और होती. अनंत उत्कंठा तिच्या आवाजांत होती.
“आता पुरे करा. कुमुदिनीला झोप लागली वाटते?” पिता म्हणाला.
अक्षय जवळ होता. त्याने ताईकडे पाहिले. त्याने खाली कान केले. तो ना श्वास ना वास. हे काय?
“कुमुदिनी” त्याने हांक मारली.
काहीं नाही. त्याने तिला हालविले. काही नाही. गुणा एकदम पुढे झाला. तो डॉक्टर होता. त्याने नाडी पाहिली. सारे थंड होते. कुमुदिनीचे दुखणे कायमचे बरे झाले. आत्मा मुक्त झाला. संगीताच्या सुरावर बसून अनंत संगीताकडे निघून गेला.
कुमुदिनीच्या हृदयाशी तो फोटो होता. घट्ट धरून ठेवलेला. गुणाच्या डोळ्यांत पाणी आले. तो फोटो त्याने घेतला.
“माझ्याजवळ ही आठवण असू दे. हा फोटो माझा नाहीं. या फोटोने मला कुमुदिनीचे स्मरण राहील.” गुणाने तो फोटो जवळ घेतला. तो कुमुदिनीच्या प्रेतयात्रेस गेला. त्याला काय वाटले असेल?