जगन्नाथ 12
“देवाघरचा पाऊस म्हणजे प्रेमाचा पाऊस.” जगन्नाथ म्हणाला.
“परंतु हा फार झाला तर गारठवतो. झिमझिम बरी वाटते. थोडी ती गोडी.”
कावेरी व जगन्नाथ जाऊ लागली. परंतु पाऊस आलाच. दोघं शांतपणे जात होती. इतक्यांत एक मुलगा पळत आला. फाटकी छत्री घेऊन आला.
“आई. ही घ्या छत्री.”
“नको रे.”
“या पाहुण्यांना तरी द्या.”
आणि पाहुण्यांना छत्री मिळाली. कावेरी भिजतच चालली.
आपण मात्र छत्रीतून जाणे त्याला बरे वाटले नाही. जगन्नाथनेहि छत्री मिटली.
“हे काय, मिटतां का?”
“मग तुम्ही घ्या ती.”
“अहो दोघं भिजण्यांत काय अर्थ? एक जण तरी कोरडे राहूं. उघडा, घ्या डोक्यावर.”
“तुम्हीच घ्या.”
“वेडे आहांत तुम्ही. थांबा मीच ती तुमच्यावर धरते. मराठ्यांनी राज्ये केली आहेत. तंजावरला शहाजीराजांचे केवढे वैभव होते! आणि राजाराम महाराजहि इकडे आले. संकटांत आम्ही आधार देतो.”
“अनाथाच्या डोक्यावर छत्री धरतां.”