इंदूर 17
“तुला येईल का असे?”
“मला नाही येणार; परंतु यांच्याजवळ शिकेन.”
“इंदु, तू एक गाणे म्हण व ते साथ करतील.”
“आता आधी जेवायला चला.” इंदूची आई म्हणाली.
“जेवल्यावर म्हणेन बाबा गाणे.” इंदु म्हणाली.
सारी जणे जेवायला बसली.
“आमची इंदु फार बोलकी आहे. प्रथम जरा बुजते. परंतु ओळख पहायला तिला वेळ नाही लागत.” मनोहरपंत म्हणाले.
“खरेच फार मोकळी. त्या बि-हाडी आली. सामान लावू लागली. बल्ब घेऊन आली. आमच्यापेक्षा तिचीच अधिक धावपळ.” रामराव म्हणाले.
“बाबा, यांना तिस-या मजल्यावर टेबल खुर्ची आहे ती द्या ना? अभ्यासाला होईल.”
“ती खुर्ची चांगली नाही.”
“मग माझी द्या. ती मी घेईन.”
“जसे तुला आवडेल तसे कर.”
“त्यांची खोली नीट नको का दिसायला? नाहीतर उद्या शाळेतील त्यांचे मित्र येतील व हसतील. आता शाळेत जाणार ना हे?”
“ते मॅट्रिकच्या वर्गात आहेत इंदु. नाही तर तू!”
“ते माझ्याहून मोठे आहेत.”
“फार नाहीत मोठे.”
‘पण थोडे तरी आहेत ना?”
“पुरे ग. किती बोलशील!” आई म्हणाली.
“बरं आता अळीमिळी.”
“जेवणानंतर गाणे म्हणायचे आहे ना?” गुणा म्हणाला.