इंदिरा 2
“शेतक-यांची दु:खे तुम्हांला दिसतात, स्वत:च्या पत्नीची दिसत नाहीत.”
“बरे बोल काय बोलायचे चे. मी ऐकायला तयार आहे.”
“तुमच्या खोलीत चला, येथे का बोलू? जगन्नाथ आपल्या खोलीत जाऊन बसला. डोळे मिटून खिन्नपणे बसला. ढोपरांत मान घालून बसला. इंदिरा आली. तिचीं कांकणे वाजली. परंतु जगनाथने वर पाहिले नाही.
“माझे तोंडहि पहावयाचे नाही अशी प्रतिज्ञा आहे का?”
“इंदिरे, माझी प्रतिज्ञा तुला माहीत आहे. मला का मोह पाडतेस?”
“माझे एवढेच सांगणे की कोठे जाऊ नका. वृद्ध आईबापांस सोडून कोठे जाऊ नका. मी रडत जन्म काढीन. परंतु जन्मदात्यांना तरी रडवू नका.”
“इंदिरे, तुझा पति जरा शहाणा होऊन यावा असे नाही तुला वाटत? हिंदुस्थानभर जावे असे मला वाटते. नवीन नवीन विचार मिळवून यावे असे मला वाटते. मग राहू आनंदाने. करू संसार. मी का तुझा त्याग करू इच्छितो? तुझा नवरा अधिक किंमतीचा व्हावा एवढीच इच्छा आहे. पशूची पत्नी होण्यापेक्षा जरा विचाराने माणुसकी आलेल्या पतीची पत्नी हो. तुला इतक्यांत घरी आणू नये असे माझे मत होते. बाबांनी फसविले. माझ्या मार्गात विघ्न यावे असा त्यांचा हेतु. परंतु तू विघ्न आणणार का? तू मला जाऊ नको असे सांगितलेस तर मी नाही जाणार. माझे काय करायचे ते तुझ्या हाती आहे. मला माकड करणार का मनुष्य करणार? इंदिरे, माझ्या मनांतील ओढाताण कशी सांगू? घरीच राहिलो तर आनंद नाही. माझ्या तोंडावर हास्य दिसणार नाही. माझा मित्रहि कोठे परागंदा झालेला. तो व त्याचे आईबाप कोठे आहेत कळत नाही. त्यांची काय स्थिति असेल? काय दशा असेल? मी का सुखांत राहूं? संसारांत दंग होऊ? नाही. मला हे सारे सहन होत नाही. माझा मित्र वनवासी तर मलाहि वनवासी होऊ दे. त्या वनवासांत हिंडेन. ज्ञान मिळवीन. तुला विचारांचा मेवा घेऊन येईन. जाऊं का मी? बाबांनी मला परवानगी दिला होती. तू दे. मला भिक्षा घाल.”
“काय करू? मी अडाणी आहे. मला काही कळत नाही. तुम्ही वनवासांत जाऊ इच्छिता. मलाहि येऊ दे. रामाबरोबर सीता गेली.”