कोजागरी 7
“चला. चांदण्यांतील सहल. चांदण्याला लुटूं.”
“चंद्रप्रकाशांत सारें रमणीय दिसतें. मळलेला कपडाहि पांढरा दिसतो. चंद्रप्रकाश दोषांवर जणुं पांघरूण घालतो. सूर्यप्रकाश दोष उघडे करतो. चंद्राचें आसक्तिमय, मोहमय प्रेम. सूर्याचें तमोहीन, धगधगीत आनासक्त प्रेम.” दयाराम म्हणाले.
“तुम्ही नाही का येत आमच्याबरोबर?” गुणानें विचारलें.
“नको, मी जातों.” असें म्हणून दयाराम उठले. जगन्नाथ व गुणा त्यांना दरवाजापर्यंत पोंचवून आले. ते गेले.
सारीं मुलें बाहेर पडलीं. नदीकांठीं मळा होता. सुंदर मळा. शेंकडों प्रकारचीं फुलझाडें त्यांत होतीं. मोसंब्याची बाग होती. मोठी विहीर होती. जगन्नाथकडचीं गुरेढोरें तेथेंच असत. तेथूनच रोज दूध घरीं येई. मळ्यांत एक माणूस नेहमीं राहत असे. त्याची झोंपडी तेथें असे. झोपडींतच त्याचा संसार. त्याचें नाव सोनजी होतें. सोनजी, त्याची बायको, चार मुलें सारीं त्या झोपडींत असत.
सोनजीची बायको बरेच दिवस आजारी होती. तिला मधून मधून जरा बरें वाटे. बरें वाटतांच ती काम करूं लागे. परंतु पुन्हा आजारी पडे. सोनजी कंटाळला होता. आणि चार पोरें घरांत. त्याला सा-यांचे करावें लागे. पुन्हा मळा सांभाळायचा, दुधें काढायचीं, मालकाकडे पोंचवायचीं; मोट धरायची. तो दमून जाई, थकून जाई. दिवसभर काम व घरांत हीं दुखणीं. त्याला विश्रांति नसे. ना मनाला ना शरिराला.
आज कोजागरी पौर्णिमा होती. बाहेर स्वच्छ शुभ्र चांदणें. परंतु सोनजीच्या मनांत निराशेची रात्र होती. काळीकुट्ट रात्र. संपूर्ण अमावस्या. गांवांत आज गाणें वाजवणें चाललें होतें. दूध पिणें चालले होतें. परंतु सोनजीच्या झोंपडींत दैन्याचें रडगाणें होतें. त्याची बायको आज जरा जास्तच आजारी होती. तो तिच्याजवळ बसला होता. पोरें झोंपली होतीं. फाटकी गोधडी त्यांच्या अंगावर होती. आईबापांच्या उबेनें तीं झोंपली होतीं.
सोनजी एकाएकीं उठला. काय त्याच्या मनांत आलें? तो एकदम उठून बाहेर पडला. तो विहिरीकडे गेला. विहिरीजवळ तो उभा होता. कां होता उभा? तटस्थ उभा होता. ना हालचाल ना कांहीं. तीं मुलें मळ्यांत आलीं. विहिरीवर त्यांना कोणी तरी दिसलें; कोण तें? भूत तर नाहीं? सारे जरा भ्याले. आपण सोनजीस जरा हांका मारूं व त्याला दाखवूं असें ते म्हणाले; सोनजीच्या झोंपडीजवळ सारे मित्र आले. झोपडींत जनी कण्हत होती, विव्हळत होती. तिच्या अंगांक ताप होता. तिचें डोकेंहि दुखत होतें.