दु:खी जगन्नाथ 5
“आणि आज तुम्ही तरुण आहात. जरा मोकळे आहात. संसारात अद्याप अडकलेले नाहीत. तोच या हिंडून फिरून. भारताचे दर्शन घेऊन. जीवन विशाल करून.”
“तुम्हांला काही पाहिजे का? मी वह्या आणल्या आहेत. खेडेगांवांतील निरनिराळ्या प्रश्नांवर तुम्ही लहान लहान संवाद लिहून ठेवा. आम्हांला प्रचाराला उपयोगी पडतील. तुम्ही छान लिहाल. ही फळे आणली आहेत माझ्या मळ्यांतील.”
“साहेबांना विचारून घेऊ. मला इतर काही नको. काही पुस्तके मजजवळ आहेत. हिंदुस्थानचा एका नव्या दृष्टीने मी इतिहास लिहिणार आहे. विस्कळित इतिहासांतील आत्मा दाखवणार आहे. त्यासंबंधी वाचतो. त्याविषयी विचार करीत असतो. एखादे पुस्तक लागले तर तुला लिहीन.”
“तुमच्या नावावर काही पैसे ठेवू का?”
“ठेव थोडे. एखादे पुस्तक मागवायला होतील.”
“मी तुम्हांला पत्र पाठवीत जाईन. तुम्हीहि पाठवा. खरे सांगू का, तुमच्यामुळे आमच्या जीवनांत प्रकाश आला.
तुम्हि देव दिला दिवा दिला
तुम्हि आम्हां हितपंथ दाविला
मतिला भरले नव्या रसें
उतराई तरि होऊं हो कसे
तुम्हांला माहीत नसेल. तुमचा आमचा फार परिचय नाही. एकदा फक्त तुम्हांला आमच्याकडे जागे केलेत. आमच्या मुलांनी बोलावले होते. त्या कोजागरीचे दिवशी तुम्ही आम्हांला जागे केलेत. आमच्या जीवनांत तुम्ही आलेले आहात. म्हणून मी भेटायला आलो. तुम्हांला पाहायला आलो.”
“मलाहि आनंद झाला. चांगले व्हा पुढे. काही तरी आपला उपयोग करा. आपण केवळ स्वत:साठी नाही, ही गोष्ट विसरू नका म्हणजे झाले.”
प्रणाम करून व आशीर्वाद घेऊन जगन्नाथ गेला. दयाराम भारती आपल्या खेलीत आले. त्यांना आनंद झाला होता. एरंडोल तालुक्यांतील आपले हिंडणे, फिरणें वाया नाही गेले एकूण. कोठे तरी बी रुजले, उगवले. काही हृदयांना प्रेरणा मिळाली. त्यांना समाधान वाटले. खोलीच्या समोर लहानशी बाग होती. ते कधी फुले बहुधा तोडीत नसत. आज आनंदी वृत्तीमुळे का कशाने ते देव जाणे, परंतु त्यांनी तेथील एक गुलाबाचे फूल तोडले. त्याचा त्यांनी वास घेतला. किती तरी दिवसांत त्यांनी त्या दिवशी तो वास घेतला होता. नाकाजवळ फूल नेले होते. परंतु ते फूल हातांत घेऊन त्या गुलाबाच्या झाडाजवळ ते पुन्हा गेले. त्या फांदीवर ते फूल त्यांनी ठेवून दिले. ते चिकटनतां थोडेच येणार होते? परंतु त्या काटेरी फांद्यांत त्यांनी ते ठेवून दिले. ते हसले. का हसले? त्यांचे त्यांनाच माहीत!