इंदु 27
“अग आज तो आला. येईल उद्यां बिद्यां.”
“परंतु थोडा वेळ बसायला तर चल.”
“आंघोळ वगैरे करून येतो. कपडे मळले आहेत.”
“आमच्याकडे नळ मोठा येतो. तिकडेच चल. कपडे पण रामा धुवील.”
“रामा नको धुवायला.”
“मी धुवीन, म्हणजे झाले? चल आतां. काढूं का ट्रंकेतून कपडे?”
“काढ. ही घे किल्ली.”
इंदूने ट्रंक उघडली. वर पुस्तके होती. वह्या होत्या. खाली कपडे होते. आणि तो फोटो! कुणाचा तो फोटो? त्याच्याखाली कुमुदिनी असें लिहिले होते. तिने तो फोटो पण घेतला. त्या कपड्यांबरोबर हळूच लपवून घेतला.
“चल गुणा.”
“तू जा पुढे. मी येतो.”
इंदु गुणाचे कपडे घेऊन गेली. ती आपल्या खोलींत बसली. तिने एका हातांत स्वत:चा फोटो घेतला व एका हातांत कुमुदिनीचा. कुमुदिनीच माझ्याहून सुरेख दिसते असे ती मनांत म्हणाली. ती ते दोन्ही फोटो हातांत खेळवीत होती तो गुणा आला.
“काय ग करतेस इंदु?”
“माझा फोटो पाहत आहे.”
“स्वत:चाच फोटो काय बघतेस?”