आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 9
“किती दिवस ग त्याची दादागिरी सोसायची?”
“आई, जगन्नाथचें तुम्ही लग्न करून टाका. म्हणजे तो सुतासारखा सरळ होईल. रेशमासारखा मऊ होईल. लग्नाची वेसण घाला. बैल मग नीट गाडी ओढूं लागेल. मग इकडे तिकडे जाणार नाहीं. भिकारी बनणार नाहीं. संसारांत रमेल. संपत्ति राखील.”
“माझ्या मनांत तेंच आहे. लग्न द्यावें करून व याला वेगळें काढावें. आमच्या देखत होऊं दे सारें. नाहींतर पुढें भाऊ याला फसवील. कांहीं देणार नाहींत. थोडीफार शेतीवाडी देतील. परंतु दागदागिने, भांडीकुंडीं कांहीं देणार नाहींत. याचा नीट संसार मांडून मग मी डोळे मिटीन.”
“आई, माझें लग्न कराल तर खरोखर मी फकीर होऊन पळेन हो. दुस-याच्या मुलीच्या गळ्याला फांस लावाल.”
“कांहीं पळत नाहींस. जाशील रुसून दोन दिवस. तिस-या दिवशीं परत येशील. आई रडत असेल असें मनांत येऊन येशील.”
“भिकारी पुन्हां दारांत येईल व घरांत शिरेल. संन्याशाचा संसार सुरू होईल.” गुणा हंसून म्हणाला.
“गुणा, खरेंच जाईन हो. चिडवूं नका मला.”
“तूं खरेंच निघालास तर मीहि येईन, दोन फकीर.”
“तुम्ही दोघे वेडे आहांत. नादी व छंदी.”
“आई, जगन्नाथचें लग्न लौकर करा.”
“हवेंच करायला.”
“मी त्या लग्नांत सारंगी वाजवीन.”
“आणि मी गाणें म्हणेन.”
“स्वत:च्या लग्नांत का स्वत:च गाणें म्हणावयाचें? अगदीं हो तूं अडाणी. कधीं तुला जगन्नाथ समजूं लागणार?”