येथें नको, दूर जाऊं 12
“खरेच गोड आहेत चरण. मी ‘गुणाची’ या ठिकाणी ‘जगूची’ असे शब्द घालीन. जातो हा जगू.”
“सकाळी ये हा गुणा.”
गुणा गेला. ते चरण गुणगुणत गेला. तो घरी आला. रामराव व गुणाची आई बोलत होती. मंद दिवा तेथे होता. आणि एकदम गुणा आला.
“आला, गुणा आला. आपली आशा आली, अंधारांतील प्रकाश आला.” रामराव म्हणाले.
“आज दिवा असा काय?” त्याने विचारले.
“त्याची वात चढतच नाही. नीट पेटतच नाही आज.” आई म्हणाली.
“उद्यापासून कोण मला लावील असे त्याच्या मनात आहे. म्हणून त्याला वाईट वाटत आहे. त्याची प्राणज्योत मंद होत चालली आहे.”
“घरांतील निर्जीव वस्तूंना वाईट वाटेल. परंतु गावातील सजीव वस्तूंना वाईट वाटेल का? हे घर सुस्कारे सोडील. परंतु गावात कोणी सोडील का सुस्कारे? गुणा, बस बाळ.” रामराव म्हणाले.
“बाबा, जगन्नाथ रडेल. तो फार दु:खी होईल. आपण कोठे जायचे बाबा?”
“दूर दूर जाऊ. कोठे तरी जाऊं. येथे नको.”
“मी जगन्नाथला रात्री पत्र लिहिणार आहे. आपण गेल्यावर त्याला मिळेल. परंतु कोठे गेलो म्हणून त्यांत लिहू? त्याला काहीच न कळविले तर त्याला काय वाटेल?”
“परंतु बाळ, आपले थोडेच ठरले आहे की अमक्या गावी जायचे असे. जळगावला जाऊ. तेथे कोणतं तरी तिकीट काझूं. जाऊ नाशिक, पंढरपूर कोठे तरी. परंतु तू काही लिहू नकोस. जातो जगाच्या पाठीवर, जातो अज्ञातवासांत, असे लिही. आपण कोठे आहोत हे कोणाला कळू नये असे मला वाटते.”