गुणा कोठें गेला गुणा? 7
तुला किती लिहूं, किती आठवूं? शब्दांत नाही रे सारे सांगता येत भावना प्रकटवायला शब्द पुरे नाही पडत. हे पत्र म्हणजे खूण समज. त्यांतील अनंत अर्थ आपोआप वाच. मी एरंडोल सोडले. काय आहे बरोबर? माझी सारंगी आहे व तुझ्या आठवणीनी, तुझ्या आठवणींनी, तुझ्या प्रेमाने तुडुंब भरलेले हृदय आहे. काठोकाठ भरलेले हृदयाचे भांडे आहे. ते मी पीत जाईन. हे भांडे कधी रिकामे होणार नाही. हे अमृत मला सदैव तारील, धीर देईल हो जगू!”
किती तरी गोष्टी त्या पत्रांत होत्या. त्या जगन्नाथलाच वाचू दे. त्या शब्दांचा, त्या शब्दांतील भावनांचा वास त्यालाच घेऊ दे, त्यातील रस त्यालाच पोटभर पिऊ दे. कितीदा तरी त्याने ते पत्र वाचले. कितीदा त्याने ते हृदयाशी धरले. अश्रूंनी भिजविले. बोटांनी हृदय पोखरून आत ठेवू पाहिले. ते पत्र जवळ धरून तो अंथरुणांत पडला व झोपला.
तो खिन्न होता. दु:खीकष्टी होता. सायंकाळी तो मळ्यांत गेला. त्या विहिरीजवळ आज तो बसला होता. सोनजीने सोनचाफ्याची फुले आणून दिली; गुलाबाची फुले आणून दिली.
“का असा दु:खी भाऊ? तू नको दु:खी होऊ, तू हसलास तर आम्ही हसू. तू एक या घरांत आहेस. अनाथांचा वाली. खरा जगन्नाथ. हंस रे भाऊ.” सोनजी म्हणाला.
जगन्नाथ हसला. त्या फुलांचा त्याने वास घेतला. तो उठला. सोनजीच्या एका मुलीच्या कानांत त्याने फूल घातले. हसला. ती लहान मुलगी लाजली. पळाली.
“आई ते बघ.” ती म्हणाली.
“त्यांना नमस्कार कर. ते देवबाप्पा आहेत.” जनीबाई म्हणाली.
जगन्नाथ गेला. अंजनी नदीच्या तीरावर बसला. आज तो एकटा होता. फिरायला आलेले कोणी कोणी त्याच्याकडे पहात होते. एकटा जगन्नाथ पाहून त्यांना वाईट वाटत होते. अंजनीच्या तरंगावर जगन्नाथने काही फुले सोडली. मित्राला वाहिली. तो घरी आला. तो खोलीत गेला. दिवा लावलेला होता. त्याने गुणाच्या फोटोला ती फुले वाहिली. दोन उदबत्त्या त्याने लावल्या. गुणाला उदबत्ती फार आवडायची. कधी आला जगन्नाथकडे तर उदबत्ती लावायचा. जणु हृदयांतील मैत्रीच्या कस्तुरीचा सुगंध बाहेर दरवळावा असे त्याला वाटे.
त्याने हातात कंदील घेतला. गुणाच्या फोटोकडे तो पहात राहिला. प्रेममय देव. आणि त्याने आता कंदील कमी केला. त्याला तो प्रकाश नको वाटला. प्रेमाच्या प्रकाशांत तो आपल्या मित्राला पहात होता. तो सर्वत्र त्याला दिसत होता. खेलीत व खोलीच्या बाहेरहि. त्याने खिडकीकडे पाहिले. वाटे तेथून गुणा हसत आहे. लबाड गुणा.
आईने हाक मारली. ती वरच आली.
“अरे अंधारांत काय करतोस? कंदील नाही का लावलास?”
“तो रॉकेलचा कंदील. तो नको. आज दुसरा दिवा मी लावला आहे.”
‘बॅटरी ना?”