इंदिरा 13
“कंटाळलीस वाटते इथे?” भाऊ म्हणाला.
“अरे ते आता येणार आहेत. घरीच जाऊ दे.”
“घर म्हणजे ते वाटते?”
“बोय भाऊ. येथे दोन दिवस यावे. अक्षय घर तेच. तेथे माझी सत्ता. आणि तुला कोठे आहे फुरसत बोलायला? जाऊ दे. आणलीस माहेरी, पुष्कळ झाले.”
“तुला काय देऊं अंबु?”
“लोभ ठेव. अंबूची आठवण ठेव. आहे एक एरंडोलला बहिण, विसरू नकोस. शंभरदा जाता मुंबई पुण्यास. यावे एखादे वेळेस बहिणीकडेहि.”
“खादीभांडारांतील सुंदर पातळ तुझ्यासाठी मी आणून ठेवले आहे. एकच होते. घेऊन ठेवले होते. तुला दाखवूं?”
“भाऊ, आता त्यांच्या हातच्या सुताचे पातळ मी नेसेन.”
“भावाने प्रेमाने दिलेलेहि नेसत जा. माझ्या हातच्या सुताचे नसले तरी प्रेमाने दिले आहे.”
“बरे हो भाऊ. नेसेन हो.”
आणि एके दिवशी अंबु निघाली. मोटारीत बसली.
“ये हो अंबु. रडत नको जाऊ. येतील ते आता लौकरच.”
“हो येतील आतां. उद्यांपासून पुन्हा मी इंदिरा होईन. आतापर्यंत काही दिवस अंबु झाले होते. अंबु हाक मारायला कधी कधी येत जा. माझ्या नावानेच पत्र पाठवीत जा.”
“तुझ्या नावाने कसे पाठवायचे?”
“बहिण का परकी आहे? मला वाचतां येतें. पाठव माझ्या नावानेच. काही बिघडत नाही. म्हणजे पत्राचे आत तरी अंबु वाचीन.”
“बरे. पाठवीन हो पत्र.”
मोटार गेली. तापीच्या पुलावरून गेली. दुतर्फा लावलेल्या आंब्याच्या नवीन झाडांमधून गेली. किती लौकर वाढली ती झाडे. ही झाडे दुनियेसाठी होती म्हणून का लौकर वाढली?