एरंडोलला घरीं 7
“इंदु, माझें मन अस्वस्थ आहे. जगन्नाथलाही शोधावयाचें आहे. मी जाऊं का ? तूं प्रेमानें मनापासून जाऊं देशील तर जाईन.”
“जा हो. परंतु लौकर या. पत्र पाठवा. प्रकृतीस जपा.” एके दिवशी गुणा स्वत:च्या आईबापांची व इंदूची परवानगी घेऊन, जगन्नाथच्या आईबापांचा आशीर्वाद घेऊन व इंदिराताईची तपस्या व प्रेम बरोबर घेऊन निघाला. पुन्हां एरंडोल त्यानें सोडलें. दु:खी कष्टी मनानें सोडले. एकट्याने सोडले. इंदिरेबरोबर इंदुहि दु:खी झाली. जगन्नाथच्या आईबापांप्रमाणेच गुणाचे आईबापही दु:खी झाले. इंदु इंदिरेकडे जाई व चरख्यावर कांतीत बसे. दोघी मैत्रिणी बनल्या. जगन्नाथची आठवण येऊन गुणा कसा गहिवरे रडे ते इंदु सांगे. गुणाची आठवण येऊन जगन्नाथ कसा दु:खी होई, त्याच्या फोटोसमोर गाणें म्हणत कसा बसे तें इंदिरा सांगे.
आणि खाली जगन्नाथच्या आईजवळ गुणाची आई बोलत बसे. ओटीवर पंढरीशेट व रामराव बसत.
“जगन्नाथला घेऊन गुणा येईल.” रामराव म्हणत.
“मलाहि तसेंच वाटतें.” पंढरीशेट म्हणत. दोघी माता तेंच म्हणत. दोघी मैत्रिणी तेंच म्हणत. सारें एरंडोल हीच आशा प्रकट करी. ही आशा का खोटी ठरेल !
कावेरी व जगन्नाथ हिंडत होती. प्रेममत्त होऊन हिंडत होती. जगन्नाथला तिनें मद्रासी लुंगी नेसविली होती. इतका गोरा मद्रासी पाहून लोक आश्चर्याने बघत. रस्त्यांतून गाणी गात दोघें हिंडत. प्रेमाची गाणी, भक्तीची गाणी; देवाची गाणी; शान्तीची गाणी, क्रान्तीचीं गाणी. त्यांच्याभोवती गर्दी जमे. जगन्नाथच्या खांद्यावर हात ठेवून कावेरी उभी पाही.
तो गाऊं लागला म्हणजे तिची जणुं समाधि लागे.
समोर एक चादर पसरलेली असे. गाणे संपले म्हणजे लोक तिच्यावर पै पैसा फेकीत. कांही दिवस असे हिंडून पैसे थोडे जमले म्हणजे दोघें एखाद्या शहरांतील पथिकाश्रमांत उतरत. तेथे आनंदाने रहात. पैसे संपले की पुन्हां फकीर बनून हिंडत.
त्यांनी अनेक क्षेत्रें पाहिली. अनेक पुरेपट्टणें पाहिली. दक्षिणेकडील प्रचंड पाषाणमय मंदिरें पाहून जगन्नाथ आश्चर्य करी.
“मानवी मनांना अशी मंदिरें बांधून काय मिळे? त्यांची मनें मोठी होती का? त्यांची मनें प्रेमळ होती का ? विचार उंच होते का? दगडात त्यांनी कला ओतली. किती ही कला ! बारीक सारीक गोष्टींतहि त्यांनी कलेची उधळपट्टी केली. दगडांतून फुलें त्यांनी फुलविली. परंतु आसपासच्या मानवी समाज सुखानें फुललेला होता का? मला कांही समजत नाही. ज्यांना आत्म्यांत कला ओतता येत नाही, ते दगडांत ओतीत असावेत. ज्यांना मानवी मूर्तींना घरदार देतां येत नाही, तो विचार ज्यांच्या हृदयांत येत नाही, ते राममंदिरे बांधीत असावेत. कावेरी, ही मंदिरें पाहून मला नाही आनंद वाटत. मला नाही प्रसन्न वाटत.”
“जगन्नाथ, त्या कलावंतांची मनें प्रसन्न नसतील तर ही कला त्यांना प्रकट करतां आली असती का? त्यांच्या आत्म्यांच कला होती म्हणून त्यांनी पाषाणांतहि ती प्रकट केली. आत्मा अभंग आहे. अभंग आत्माची कला अधिक का टिकणा-या दगडांतून त्यांनी प्रकट केली. पाषाणांत त्यांनी छिनीनें उपनिषदे लिहिली. ही मंदिरें म्हणजे वेद आहेत. ह्या आत्म्याच्या वैभवाच्या खुणा आहेत. हिंदुमंदिरांचे कळस बारीक बारीक होत गगनाला
जणुं भेटूं पहातात. मुसलमान बंधूंच्या मशिदींना भव्य घुमट असतात. जगन्नाथ, यांतील अर्थ आहे का तुला माहीत?”