कोजागरी 10
“सोनजी, आईला सांगून मी उद्यांपासून दूध देववीन हो. आणि जनीला दवाखान्यांत घेऊन जाईन. आपल्या छकड्यांतून नेईन.”
तीं मुलें मजेसाठीं फिरायला आलीं होतीं. परंतु गंभीर होऊन माघारीं चाललीं. बगीच्यांतील फुले पहायला आलीं होतीं. परंतु सोनजीचे अश्रु पाहून मागें वळलीं. त्यांना त्या विहिरीजवळ बसायला आतां धीर होत नव्हता. ते मुके होऊनच परतले. त्यांना का जागृति आली? मघां दयाराम भारतींनीं सांगितलें होतें कां, डोळे उघडून सर्वत्र पहा. आसपासच्या समाजाची स्थिति पहा. जागे व्हा. ते जागे होऊन परत जात होते. सोनजीला दुधाचा थेंब घेतां येत नाहीं. मळ्यांतील एक मोसंबे घेतां येत नाहीं. आणि जगन्नाथच्या घरीं कोणी आलें तर त्यांना केशर लावून दूध देण्यांत येई. मसाला घालून दूध देण्यांत येई. सोनजी आपल्या मळ्यांत खपतो, मळ्यांत राहतो. तो आपल्याच कुटुंबांतील असें आपणांस कां वाटूं नये? आपण दूध प्यालों. सोनजीची कां नाहीं आठवण झाली? गरीब हे श्रीमंतांच्या आठवणींत कसे येतील? गरिबांचें जीवन ही का स्मरणीय वस्तु आहे? विचारणीय वस्तु आहे? माणसापेक्षाहि आपणांस आपलीं कुत्रीं, मांजरें, पोपट, मैना अधिक प्रिय आहेत! कितीतरी विचार जगन्नाथच्या मनांत उसळले.
“जगन्नाथ, त्या छगन शेटजींकडे पोपट आहे ना, त्याला मुंबईहून डाळिंबांचें पार्सल येतें.” बाबू म्हणाला.
“आणि गिरिधारीलालांकडे कुत्रा आहे, त्याची काय मिजास?” बन्सी म्हणाला.
“अरे काठेवाडांत एक संस्थानिक आहे. त्यानें कुत्र्यांसाठीं बंगले बांधले आहेत. कुत्र्यांना गाद्या लोळायला. त्यांना उजाडत खीर खायला.” आनंदा म्हणाला.
“काठेवाडांत कशाला? आपणांकडे तेच प्रकार आहेत.”
“अमळनेरला का कोठें एका श्रीमंताच्या लग्नांत लोकांना जेवतांना सोडा वॉटरचें पाणी देत होते. म्हणजे लगेच म्हणाले पचन. लगेच पोट हलकें. मग आणखी आग्रह.” श्यामनें सांगितलें.
“कोणी कुत्राकुत्रीचीं थाटानें लग्ने लावतात. त्यांची वरात काढतात.”
“पुण्याला कोणा श्रीमंताने बाहुला-बाहुलीच्या लग्नांत पांच हजार रुपये खर्च केले म्हणे.” रमण म्हणाला.
“परंतु गरिबांचे संसार हे असे.”
“त्यांना ना दवा ना दूध.”
“त्यांना ना अन्न ना वस्त्र.”
“त्यांना ना सुख ना विश्रांति.”