ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 1
आषाढी एकादशीचा दिवस. पंढरपूरचा सोहळा कोण वर्णील ? सारे वातावरणजसें निनादून गेले होतें ! जिकडे तिकडे अभंग, जिकडे तिकडे विठूच्या नामाचा गजर व कावेरी क्षेमलिंगाने हेत होते. एकमेकांच्या पायां पडत होते. भेदभाव विसरून सारे एका भक्तिगंगेत डुंबत होते.
गर्दीतून जगन्नाथ व कावेरी यांनी दर्शन घेतले. लहान प्रेमानंद गुदमरला. फूल चुरगळले.कशीतरी हळूहळू ती बाहेर आली.
“किती गर्दी, किती धक्काबुक्की !” जगन्नाथ म्हणाला.
“मला त्यांत आनंद वाटत होता. हजारों रूपांनी नटलेला पांडुरंग जणुं स्पर्श करीत होता. विराटू भारताचा स्पर्श. जनताजनार्दनाचा स्पर्श. सागराच्या सहस्त्र लाटा अंगावर खेळायला आल्या तर का करंट्याप्रमाणे दूर सारावयाचें ? प्रेमा मात्र जरा गुदमरला.”
“झोपव त्याला मांडीवर. चल नाहीतर आपण वाळवंटात जाऊं. चंद्रभागेच्या तीरी जाऊं.”
“चल जगन्नाथ.”
“आणि तिघें गेली. आकाशांत ढग जमा झाले. पाऊस येणार की काय ?
चंद्र दिसत नव्हता. प्रेमा झोपला होता. परंतु एकाएकी कावेरीला उलटी झाली. भयंकर वांति ती घाबरली जगन्नाथनें धरून ठेवलें.
“काय ग कावेरी ?”
“गळून गेले मी जगन्नाथ.”
“पड माझ्या मांडीवर. ठेव हो डोके.”
तो थोपटीत होता. तो पुन्हां वांति. जगन्नाथ घाबरला. कॉलरा की काय ? परंतु कुठे जायचें ? या गर्दीत कुठे जायचे ? आणि यांना येथें सोडून कसा जाऊं ? यांना घेऊन तरी कसा जाऊं ? कावेरीला इतक्यांत जुलाब झाला. जोराचा जुलाब. जगन्नाथनें नीट पुसले. दुसरे एक वस्त्र त्यानें तिला नेसवलें, गुंडाळलें. परंतु छे. पुन्हां जुलाब ! पुन्हां वांति ! थकली, भागली. तिला बोलवेना. ती निश्चेष्ट पडली. इतक्यांत बाळ जागे झालें.
“दे माझ्याजवळ, शेवटचे पाजतें.”