इंदु 29
“माझ्या ट्रंकेत जो माझा एक फोटो आहे तो हृदयाशी धरून कुमुदिनी देवाघरी गेली. संगीत मरण. ऐकतां ऐकतां मरण. हृदयांत भावनांची पौर्णिमा फुलली असतां मरण. शांत प्रसन्न मरण.” गुणा म्हणाला.
“हा पवित्र फोटो आहे. हा फोटो म्हणजे मूर्तिमंत भावना आहे.” असे म्हणून इंदूने तो मस्तकी धरला. मनोहरपंत दिवाणखान्यांत बसले होते. त्यांनी गुणाला हांक मारली.
“गुणा, इंदूचा व तुझा विवाह व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुमचे परस्परांवर प्रेम आहे. एवढ्यासाठी मी मुद्दाम तुला बोलावलें.”
“परंतु परीक्षा देऊन येऊं दे.”
“डॉक्टर झालेच आहांत. आणि कलकत्त्याचीहि परीक्षा पास व्हाल. परंतु माझ्या मनांत येत आहे की आतांच तुमचे लग्न आटपून टाकावे. तुम्ही आतां मोठी आहांत. फार मोठे अवडंबर नको. वैदिक पद्धतीचे लग्न. चार मित्र येतील. आटपून घेऊं. लग्न करूनच आतां कलकत्त्यास जा म्हणजे बरे.”
“तुमच्या इच्छेच्याविरुद्ध मी नाही.”
“तुमच्या वडिलांजवळ मी बोललो आहे. त्यांचीहि ना नाही.”
“बरे तर.”
गुणा आपल्या घरी गेला.
“काय रे, मनोहरपंत काही बोलले का?”
“हो. लग्नाविषयी बोलले.”
“गुणा, तूं भाग्याचा आहेस. अशी सुंदर गुणी मुलगी, श्रीमंताची मुलगी. तुला मिळेल असे स्वप्नांतहि नव्हते.”
“तुम्ही सारंगी शिकवलीत तिचे हे फळ.”